तुमची वैयक्तिक माहिती लिक करतात तुमच्या मोबाईलमधील अॅप


नवी दिल्ली : एखादे अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करताना पर्सनल इन्फोर्मेशन बघण्याची परवानगी मागितली जाते. कोणताही विचार न करता आपण ओके वर क्लिक करुन माहिती देण्याची परवानगी देतो. पण येथून पुढे तुम्हाला हे करताना भिती वाटेल. कारण एकूण अॅपपैकी ७० टक्के अॅप वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती थर्ड पार्टी कंपन्यांना देत असल्याचे एका अभ्यासात उघड झाले आहे. गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांचा या थर्ड पार्टी कंपन्यांमध्ये समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्मार्टफोनमध्ये कोणतेही अॅप इन्स्टॉल करीत असताना सर्वप्रथम वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती पाहण्याविषयी परवानगी मागितली जाते. ही संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती फारच थोड्या अॅपकडून गोपनीय ठेवली जाते. ही माहिती बहुतांश अॅपकडून वापरण्याची परवानगी मिळाल्यानंतर ती डेव्हलपर किंवा थर्ड पार्टीशी शेअर केली जाते. त्यामुळे संबंधित कंपन्यांना वापरकर्त्याचा पूर्वेतिहास आणि हालचाली टिपणे शक्य होते, असे संशोधकांनी अभ्यासात नमूद केले आहे.

स्पेनमधील ‘आयएमडीईए नेटवर्क्स इन्स्टिट्यूट’ने अॅपकडून वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय नेमका किती डेटा आणि गोपनीय माहिती हस्तांतर केली जाते, या विषयी सविस्तर अभ्यास केला. त्यांनी त्यासाठी ‘ल्युमेन प्रायव्हसी मॉनिटर’(Lumem Privacy Monitor) नामक अॅपची निर्मिती केली. स्मार्टफोनमधून नेमका किती डेटा आणि माहितीचे हस्तांतर होते, याची स्पष्ट आकडेवारी या अॅपच्या माध्यमातून प्राप्त होते. ही आकडेवारी रिअल टाइमवर आधारित असते, असा दावा संशोधकांनी केला आहे. अॅपच्या वर्तणुकीचा अभ्यास करून वापरकर्त्याच्या परवानगीविना थर्ड पार्टीला नेमका किती आणि कोणत्या प्रकारचा डेटा हस्तांतर करण्यात येत आहे, त्याची माहिती ‘ल्युमेन’च्या मदतीने साठवून ठेवण्यात येते.

१६००हून अधिक यूजर ऑक्टोबर २०१५पासून ‘ल्युमेन’चा उपयोग करीत असून, आतापर्यंत पाच हजार पेक्षा अधिक अॅपची पडताळणी करण्यात आली आहे. या माध्यमातून आम्ही आतापर्यंत ५९८ वेबसाइट्सपर्यंत पोहोचलो आहोत. या वेबसाइट जाहिरातीच्या, सोशल मीडियाच्या विशेषतः गुगल, याहू, फेसबुक या कंपन्यांच्या माध्यमातून यूजरच्या वैयक्तिक माहितीचा आढावा घेतात, असेही संशोधकांनी स्पष्ट केले. आम्ही बनवलेल्या एका ट्रॅकरच्या जाळ्यात ७० टक्क्यांहून अधिक अॅप सापडली आहेत. तर, १५ टक्के अॅप पाच किंवा त्यापेक्षा अधिक ट्रॅकरच्या जाळ्यात सापडली आहेत, असेही संशोधकांनी स्प्ष्ट केले.

Leave a Comment