फक्त एका एसएमएसवर कळणार पेट्रोल, डिझेलचे दर


मुंबई : लवकरच तुमच्या मोबाईलवर जो एसएमस येईल त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका. कारण तुम्हाला या एसएमएसमुळे महत्त्वाची माहिती मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या १६ तारखेपासून रोजच्या रोज बदलणार आहेत. तेल कंपन्यांनी या पार्श्वभूमीवर ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर जाणून घेण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

आता घरबसल्या मोबाईलवरून ग्राहकांना केवळ एक एसएमएस पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती मिळणार आहे. वितरकांनी पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. पण तेल कंपन्या या निर्णयावर ठाम आहे. यासाठीची सर्व तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार वितरकांना आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दुसऱ्या दिवशीचे दर कळवण्यात येतील. तर सामान्य ग्राहकांना मोबाईलवरून एसएमएस पाठवून प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती मिळवता येईल.

हिंदूस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. नवी प्रणाली लागू झाल्यानंतर प्रत्येक शहरात आणि प्रत्येक पेट्रोलपंपावर पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळेही असू शकतात. पण ग्राहकांना त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे दर जाणून घेण्यासाठी पेट्रोल पंपावर खेटे मारावे लागले असते. पण एसएमएस सुविधेमुळे ग्राहकांना प्रत्येक पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर घरबसल्या कळू शकणार आहेत.

देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ६ जूनपासून इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलणार आहेत. पेट्रोलियम पदार्थाच्या दरामध्ये दररोज बदल करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केली होती. यानुसार पुदुच्चेरी, उदयपूर, आंध्र प्रदेशमधील विझाग, जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरांमध्ये १ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलले जात होते. या शहरांमधील प्रतिसादाच्या आधारे देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

‘इंडियन ऑईल’च्या पेट्रोल पंपावरील दर जाणून घेण्यासाठी www.iocl.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. Fuel@IOC हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही जवळपासच्या पेट्रोल पंपावरील दर जाणून घेऊ शकता. मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवावा. मात्र, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणे आवश्यक आहे.

‘भारत पेट्रोलि‍यम’च्या पेट्रोल पंपावरील दर जाणून घेण्यासाठी www.bharatpetroleum.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. मोबाइलवर SmartDrive हे अॅप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जवळपासच्या पेट्रोल पंपावरील दर जाणून घेऊ शकता. मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२३११२२२२ या क्रमांकावर SMS पाठवावा. मात्र, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणे आवश्यक आहे.

Leave a Comment