घरी जाताना डिलिव्हरी द्या,पैसे कमवा- वॉलमार्टची कर्मचार्‍यांना ऑफर


अमेरिकेतील सुपर मार्केट वॉलमार्टने ऑनलाईन सेवा देताना ग्राहकांना डिलिव्हरी लवकर मिळावी त्याचबरोबर शिपिंग कॉस्ट कमी व्हावी व आपल्या कर्मचार्‍यांनाही चार पैसे जादा मिळवेत यासाठी एक शक्कल लढविली आहे. यात कर्मचार्‍यांना घरी जाताना त्या मार्गावर असलेल्या ग्राहकांची डिलिव्हरी देण्याची ऑफर दिली गेली आहे. वॉलमार्ट सुपरमार्केटमध्ये सर्वाधिक महसूल गोळा करणारी कंपनी आहे मात्र ऑनलाईन ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनीची व्यवस्था अपुरी पडते आहे. त्यामुळे ऑनलाईन जायंट अमेझॉनशी टककर घेण्यासाठी व त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी वॉलमार्ट प्रयत्नशील आहे. वरील मोहिम हा त्याचाच एक भाग आहे.

वॉलमार्टची अमेरिकेत ४७०० स्टोअर्स आहेत व त्यांच्याकडे सुमारे दीड लाख कर्मचारी वर्ग आहे. त्यांच्या ग्राहकातील ९० टकक्के ग्राहक १० मैल परिसरातील आहेत. या ग्राहकांनी मागविलेला माल कंपनीच्या कर्मचार्‍यांनीच डिलिव्हर केला तर तो अधिक वेगाने व कमी खर्चात पोहोचणार आहे व त्याबदली कर्मचार्‍यांनाही जादा पैसा मिळणार आहे. सध्या तीन स्टोअर्समध्ये ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात आहे. अर्थात कर्मचार्‍यांना डिलीव्हरी पोहोचविणे बंधनकारक नाही तर हे काम ऐच्छीक स्वरूपात करावयाचे आहे. न्यूजर्सी, अर्कान्सामधील स्टोअर्समध्ये ही योजना सुरू आहे.

जे कर्मचारी या कामासाठी उत्सुक असतील त्याना दिवसांत १० डिलीव्हरी द्याव्या लागतील. वॉलमार्टचा महसूल गतवर्षी ४८६ अब्ज डॉलर्स होता तर अमेझॉनचा महसूल १३६ अब्ज डॉलर्स होता. मात्र ऑनलाईन ऑर्डरमध्ये वॉलमार्ट अमेझॉनच्या खूपच मागे आहे. त्यातून आता अमेझॉनने तत्काळ डिलीव्हरीसाठी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी वॉलमार्टला आपले नेटवर्क अधिक मजबूत व वेगवान करणे आवश्यक ठरले आहे.

Leave a Comment