समोसे विकणाऱ्याचा मुलगा चमकला आयआयटी जेईई परीक्षेत


नवी दिल्ली – आयआयटी जेईई अॅडव्हांस परीक्षेत समोसे विकणाऱ्याच्या मुलाने यश संपादन केले असून या परीक्षेत त्याने ६४ वा क्रमांक मिळवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ३६६ पैकी त्याला ३१० गुण मिळाले आहेत.

जेईई २०१७ परीक्षेचा निकाल रविवारी घोषित झाला. चंदीगडच्या सर्वेश मेहतानीने आयआयटी जेईईच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला, पुण्याच्या अक्षत चुगलाने दूसरा क्रमांक मिळाला तर दिल्लीच्या अनन्य अग्रवालने तिसरा क्रमाक मिळवला. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणातील ३० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत टॉप १०० मध्ये स्थान मिळवले. यात व्ही. मोहन याने ६४ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि स्वतःच्या मेहनतीला देतो.

मोहनच्या कुटुंबाची आर्थिकस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मात्र त्याने त्याच्या परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. मोहनचे वडील समोसे विकतात, त्यांचे एक छोटेखानी दुकानही आहे. व्ही. मोहनने यापूर्वी जेईई परीक्षेत संपूर्ण देशात सहावे स्थान मिळवले होते. जेईई मेन्समध्ये त्याने ३६० पैकी ३४५ गुण मिळवले होते. एवढेच नाही, तर त्याने आंध्रप्रदेश इंजनिअरिंग, अॅग्रीकल्चर अॅण्ड मेडिकल कॉमन एंट्रन्स टेस्टमध्ये टॉप रँक मिळवला होता.

यावर व्ही मोहन याचे वडील म्हणतात, आम्ही १३ वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये आलो. तेव्हापासून समोसे विकण्याचा आमचा व्यवसाय आहे. माझ्या मुलाने चांगले गुण मिळवल्याचा हेवा वाटतो, अशी प्रतिक्रिया व्ही. मोहन याचे वडील सुब्बा राव यांनी दिली.

Leave a Comment