अरूण जेटली यांनी ६६ वस्तुंवरील जीएसटीमध्ये केली कपात


नवी दिल्ली – ६६ उत्पादनांवरील जीएसटी करात कपात करण्याचा निर्णय जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर परिषदेने रविवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. एकूण १३३ वस्तूंवरच्या जीएसटी मध्ये बदल करावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ६६ उत्पादनांवरील जीएसटीमध्ये आम्ही बदल करून ते कमी केले आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

विशेषत: शेतीसाठी लागणा-या ट्रॅक्टर आणि त्यासंदर्भातली यंत्रसामुग्री वरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. कॉम्युटर प्रिंटरवर २८ टक्क्यांऐवजी आता १८ टक्के कर लागणार आहे. काजूवर १८ ऐवजी १२ टक्के कर लागणार आहे. इन्सुलिनवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के, स्कूलबॅगवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्रपटाचे तिकीट ज्या चित्रपटागृहांमध्ये १०० रूपयांपेक्षा कमी आहे त्या चित्रपटागृहांमधील तिकीटांवर २८ ऐवजी १८ टक्के कर लावण्यात आला आहे. तर, १०० रूपयांपेक्षा जास्त तिकीटदर असलेल्या तिकीटांवर २८ टक्के जीएसटी कायम राहणार आहे. टेलिकॉम सेक्टरवर असलेला १८ टक्के जीएसटी तसाच ठेवला जाणार आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीने हा कर कमी करण्याची मागणी केली होती पण ही मागणी पूर्ण झालेली नाही.

एकूण १३३ उत्पादनांवरील कराचा फेरआढावा घेण्याच्या शिफारशी जीएसटी परिषदेकडे आल्या होत्या. त्याचा अभ्यास करून ६६ उत्पादनांवरील करात कपात करण्यात आली आहे. जीएसटी परिषदेची पुढील बैठक पुढील रविवारी म्हणजेच १८ जून रोजी होणार आहे.

Leave a Comment