निकालामुळे नका होऊ निराश


आपण वर्षभर तयारी करून परीक्षा दिल्यानंतर केवळ या दिवसाची वाट बघत असतो ते केवळ आपल्याला किती यश मिळाले हे जाणून घेण्यासाठी, यात अनेकांना यश येते तर अनेकांच्या पदरी अपयश पडते. अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळालेले मित्र मैत्रिण खूश असतात तर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी काहीसे हिरमुसलेले असतात. अनेक पालक पास झाल्याचा आनंद मानण्याऐवजी मुलाला कमी गुण मिळाल्याचा राग काढतात. परिणामी मुलांमध्ये नैराश्य येते. केवळ दहावी आणि बारावी म्हणजे सर्व काही नाही. त्यानंतरही करिअरच्या विविध मोठ्या संधी उपलब्ध असतात.

तुमचे नैराश्य या गोष्टी पाळल्या तर नक्कीच दूर होईल. सर्वात आधी आपला आलेला निकाल हा पूर्णपणे मान्य करावा. एका परीक्षेचा निकाल आहे, तुमच्या अस्तित्वाचा किंवा पूर्ण शर्मतेचा नाही. पुन्हा एकदा स्वत:कडे व स्वत:च्या ध्येयाकडे त्रयस्थ होऊन पहा मिळालेले गुण खरच योग्य आहेत की नाही हेही तपासून बघा. तुमच्या करिअरसाठी दुसरे पर्याय / मार्ग आहेत का? हे जाणून घ्या. विशिष्ट कॉलेजमध्ये अँडमिशन हवी आहे, असा हट्ट करू नका. दुसर्‍या कॉलेजला जाण्याची तयारी ठेवा. पुढच्या टप्प्यातील मार्गांवर लक्ष ठेवा. बारावी / ग्रॅज्युएशननंतर देखील अनेक करिअरचे पर्याय/मार्ग आहेत, हे लक्षात असू दया. अपेक्षित गुण व मिळालेल्या गुणांमध्ये खूप तफावत असेल तरच आणि तरच पुन्हा तपासणीला पाठवा. ड्रॉप घ्यायचा विचार असेल तर पुन्हा मेहनत घेण्याची तयारी, वाढणारी स्पर्धा, कमी होत जाणार्‍या सीट व स्वत:ची मानसिक तयारी या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या.

पर्याय कोर्ससाठी अँडमिशन घेण्याची तयारी ठेवा. कोणत्याही सरकारमान्य किंवा मान्यताप्राप्त संस्थेतच अँडमिशन घ्या. गरज पडल्यास बाहेर जाण्याची तयारी ठेवा. तुम्ही निकाल बदलू शकत नाहीत, पण येणारे आयुष्य योग्य मेहनत, योग्य विचार, व योग्य प्लॅनिंगमुळे नक्की बदलू शकता, हे लक्षात ठेवा.

Leave a Comment