टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनात नवे फेरबदल


मुंबई: कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनात नवे फेरबदल करण्याचा प्रस्ताव देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून कार्यकरत असलेल्या टाटा मोटर्सच्या विचाराधीन असून कंपनीतील सर्व पदे नव्या फेरबदलानुसार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, यापूढे कंपनीत कोणीच वरिष्ठ व कनिष्ठ असणार नाही. कर्मचाऱ्यांना आपल्या गुणवत्तेस वाव देण्यात यावा यासाठी कंपनी हा निर्णय घेणार असल्यामुळे टाटा मोटर्समध्ये यापूडे ‘बॉस’ प्रणालीला गुडबाय केले जाणार आहे. संभाव्य नव्या बदलामुळे टाटा मोटर्समध्ये पदांच्या बाबतीत का होईना ‘साम्य’वादाचे वारे वाहू लागल्याची चर्चा आहे.

कंपनीने हा निर्णय समूह कार्याला (टीम वर्क) वाव मिळावा तसेच, कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य मिळावे यासाठी घेतल्याचे समजते. हा निर्णय सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. या निर्णयानुसार कोणताही कर्मचारी बॉस, वरिष्ठ अथवा कनिष्ठ असणार नाही. सर्व कर्मचारी एकाच स्तरावर असतील. तसेच, प्रत्येक विभागात एक लीडर असेल. त्या लीडरला ‘हेड’ असे संबोधण्यात येईल. त्याच्या नावासमोर व्यक्तीचे नाव आणि कामाचा किंवा डिपोर्टमेंटचा उल्लेख असेल.

बहुराष्ट्रीय कंपन्या विशेषत: सर्व्हिस एजन्सीजमध्ये सर्व कर्मचारी समान या तत्वांवर काम चालते. येथे कोणी बॉस असत नाही. येथे टीम वर्क असते. या निर्णयामुळे टाटा मोटर्समध्येही सर्विस एजन्सी संस्कृती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा निर्णय कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल. यापूर्वी कर्मचारी काम करत असताना पदांवर लक्ष ठेवत असत. त्यामुळे त्यांचे काही प्रमाणात कामाकडे दुर्लक्ष होत असे. आता पुन्हा कर्मचारी आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करतील, असा विश्वास टाटा मोटर्सने व्यक्त केला आहे.

Leave a Comment