एका तासात पायी फिरून होतो हा देश


एखादा देश एका तासाच्या भटकंतीत फिरता येतो असे सांगितले तर त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मात्र फ्रान्सला लागून असलेला मोनॅको हा चिमुकला देश खरोखरच १ तासात पायी फिरता येतो. विशेष म्हणजे या चिमुकल्या देशात प्रचंड संख्येने पर्यटक येतात व जगातील श्रीमंत देशात त्याची गणना होते. या देशाचे क्षेत्रफळ अवघे १.९५ चौरस किलोमीटर असून मोनॅको असेच या देशातील एकमेव शहराचे नांव आहे. हा देश फॉर्म्युला कार रेसिंग, जगप्रसिद्ध कॅसिनो व उत्तम हवामानाबद्दल जगभरात प्रसिद्ध आहे.

दुसरे आकर्षण म्हणजे येथे नागरिकांना आयकर भरावा लागत नाही. नागरिकांना अव्वल दर्जाची सुरक्षा व सुविधा दिल्या जातात. मेडिटेरियन समुद्राच्या उत्तरमध्य किनार्‍यावरचा हा देश तीन बाजूंनी फ्रान्सने वेढलेला आहे व इटाली येथून अवघ्या १६ किमीवर आहे. देशात फ्रंेच भाषा बोलली जाते. येथे होत असलेले फॉर्म्युला कार रेसिंग, जगप्रसिद्ध माँटेकार्लो कॅसिनो, व शाही परिवाराची शानशौकत ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. येथे राहणारे बहुतेक नागरिक श्रीमंत आहेत व त्यांचे परदेशांशी संबंध आहेत. १९२७ पासून येथे राजेशाही आहे.


या चिमुकल्या देशातील क्वार्टियर गोल्डन स्कवेअर मध्ये फॅशनेबल हॉटेल्स, नाईटक्लब, रेस्टॉरंट, बुटीक्सची एकच भाऊगर्दी आहे. कार रेसिंगबरोबरच येथे गोल्फ, फूटबॉल, वॉटर स्पोर्टस यांच्याही स्पर्धा सतत होत असतात. व्हॅटिकन सिटी नंतरचा हा जगातला दुसरा छोटा देश आहे. येथे ऐतिहासिक आर्कीटेक्चरल कॅथेड्रल दे मोनाको, ७ हजार प्रकारचे कॅक्टस असलेले उद्यान, जपानी गार्डन, १३ व्या शतकातील शाही निवास पॅलेस डू प्रिन्स, ४ हजार प्रकारचे गुलाब असलेले बगिचे, सरोवरातील हंस अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पायी चालायचे नसेल तर बस घेता येते. फ्रान्समधून येथे बस व रेल्वेने जाता येते.