पश्चिम घाटात सापडला खेकड्यांचा नवा वंश आणि प्रजाती


तिरुअनंतपुरम: जैववैविध्याने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाच्या केरळमधील भूभागात शास्त्रज्ञांनी खेकड्यांच्या एक नवा वंश आणि त्यातील ६ प्रजाती शोधून काढल्या आहेत. जैववैविध्याचे जातं आणि संवर्धन व्हावे; यासाठी अतिसंवेदनशील म्हणून घोषित आणि संरक्षित करण्यात आलेल्या पश्चिम घाटाचे नाव या नवीन संशोधनामुळे पुन्हा एकदा जगभरातील अभ्यासक आणि निसर्गप्रेमींच्या चर्चेत आले आहे.

झुओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे एस के पती, पी एम सुरेशन, केरळ विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्र विभागाचे एल राजेश, स्मृती राज, ए बिजू कुमार आणि नागरकोयल येथील होळी क्रॉस महाविद्यालयाचे प्रा. व्ही यु शीजा यांच्या पथकाने खेकड्यांच्या या प्रजाती शोधल्या असून त्यांच्या संशोधनाचा निबंध ‘जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

केरळमधील पर्वतीय प्रदेशात असलेल्या घनदाट जंगलांमध्ये वाहत्या पाण्याच्या परिसरात अधिवास असलेल्या या खेकड्यांच्या वंशाचे नाव ‘कर्कट’ असे ठेवण्यात आले आहे. संस्कृत भाषेत खेकड्याला कर्कट म्हटले जाते. सध्या ज्ञात असलेल्या खेकड्यांच्या वंशांपेक्षा वेगळ्या, स्वतंत्र अशा वैशिष्ट्यांमुळे या खेकड्यांना स्वतंत्र वंशाचा दर्जा देण्यात आला आहे.

या वंशापैकी एक प्रजाती ‘घनरक्त’ हा खेकडा एर्नाकुलम जिल्ह्यातील थट्टेकड पक्षी अभयारण्यात आढळून आला आहे. या खेकड्याचा रंग फिक्कट जांभळा असल्याने त्याला हे नाव देण्यात आले आहे. ‘कर्कट कुसुंभा’ या दुसऱ्या प्रजातीचा खेकडा इडुक्की जिल्ह्यातील मनकुलाम येथे सापडला. संस्कृतमध्ये करडईला कुसुंभा म्हटले जाते. या खेकड्याच्या नारिंगी-लाल रंगामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे.

याशिवाय तिरुअनंतपुरम येथील अगस्त्यमाला अभयारण्यात पाणथळ जागी ‘पिलार्त’ या वंशातील ‘पिलार्त अरोमा’ या प्रजातीचा खेकडा सापडला आहे. थट्टेकड पक्षी अभयारण्यात याच वंशाच्या पिलार्त पुंकटाटिस्सीमा’ या प्रजातीचा खेकडा सापडला आहे. या शिवाय भातखाचरांमध्ये खोल बिळांमध्ये राहणारे ‘सिलिंड्रॉटेलफूस लॉंगीफॉलस’ आणि त्याच कुळातील ‘ब्रेव्हीफॉलस’ या प्रजातींचे खेकडे तिरुअनंतपुरम आणि थ्रिसूर नजीकच्या जंगलात संशोधकांना आढळले.

Leave a Comment