स्टेट बँकेच्या परीक्षांसाठी आधार कार्ड ठरणार महत्त्वाचा दस्तावेज


नवी दिल्ली – एका मागून एक सरकारी योजनांसाठी केंद्र सरकारकडून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्यानंतर आता आपल्या भरती प्रक्रियेसाठी लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज स्टेट बँक ऑफ इंडियाही आधार कार्ड सक्तीचे करणार आहे. उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियातील रिक्त पदांसाठी अर्ज करताना आधार कार्ड आणि आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. हा निर्णय तूर्त अंमलात आलेला नसला तरी त्यावर गांभीर्याने विचार सुरू असून, त्याची अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून करण्यावर विचार करण्यात येतो आहे. नुकतेच एक परिपत्रक स्टेट बँकेकडून जारी करण्यात आले. ही माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे.

आधार कार्डाचा पुरावा जम्मू-काश्मीर, मेघालय आणि आसाम या तीन राज्यांतील उमेदवार वगळता इतर सर्व राज्यांतील इच्छुक उमेदवारांसाठी बंधनकारक करण्यात येईल. जम्मू-काश्मीर, मेघालय आणि आसाम या तीन राज्यांतील उमेदवारांसाठी बँकेने निर्धारित केलेला इतर कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.

बँकेच्या भरती प्रक्रियेत परीक्षा घेताना उमेदवारांची ओळख पडताळणे अत्यंत जिकरिचे असते. अनेकवेळा बनावट परीक्षार्थी परीक्षेला बसतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी बँकेने आधार कार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे उमेदवारांची पडताळणी अधिक नेमकेपणाने करणे शक्य होणार आहे. स्टेट बँकेतील नोकरीसाठी अनेक तरूण आणि तरुणी इच्छुक असतात. या सर्वांना आता आधार कार्ड काढणे आवश्यक ठरणार आहे.

Leave a Comment