सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या आठवड्यापासून कर्जमुक्तीच्या मनःस्थितीत यायला लागले आहेत. एवढेच नव्हे तर आपले सरकार जी कर्जमाफी देईल ती महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी असेल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो की काय अशी शंका शिवसेनेच्या मंत्र्यांना आली. ही कर्जमाफी झालीच तर तिचे श्रेय कोणाला मिळणार यावरून आता राजकारण सुरू झालेले दिसत आहे. कर्जमाफी झालीच तर ती शिवसेनेमुळेच झाली असे भासवण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. एकंदरीत कर्जमाफीचे श्रेय आपल्यालाच मिळावे अशी त्यांची धडपड आहे. शिवसेनेच्याच संभ्रमाचा हा सारा परिणाम आहे. आपण सत्ताधारी आहोत की विरोधक आहोत याबाबत शिवसेना नेत्यांच्या मनात संभ्रम आहे तोच अशा प्रकारच्या निर्णयातून प्रतित होत असतो.
शिवसेनेचे संभ्रम पर्व
शिवसेनेच्या मंत्र्यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर काल बहिष्कार टाकला. त्यातसुध्दा संभ्रम आहे. कारण शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून आपली छबी निर्माण करायची आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवरील बहिष्कार हे विरोधक असल्याचे लक्षण आहे. म्हणून शिवसेनेचे मंत्री काल या बैठकीला गैरहजर राहिले. परंतु त्याला बहिष्कार म्हणावा की गैरहजेरी म्हणावी यावर आता वाद सुरू झाला आहे. शिवसेनेला सत्ताधारी म्हणावे की विरोधक म्हणावे हा जसा एक वाद आहे. त्याच वादाचा एक पैलू या कथित बहिष्कारातून प्रकट होताना दिसत आहे. म्हणून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडणे पसंत केले. शिवसेनेचा हा बहिष्कारच असेल तर त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली कशासाठी हा प्रश्न अनुत्तरित असतानाच सेनेचे काही नेते हा बहिष्कारच आहे असे जोर देऊन सांगत आहेत. या सगळ्या प्रकारामागे मतांचे राजकारण आहे आणि त्यासाठी शेतकर्यांचा संप, त्यासाठी कर्जमाफी हे मुद्दे वापरले जात आहेत. महाराष्ट्रात संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असतानाच शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे लंडनमध्ये बसलेले आहेत. ते तिथे काय करत आहेत हे माहीत नाही. परंतु राज्यातली स्थिती अभूतपूर्व झालेली असताना ते लंडनमध्ये काय करत बसले आहेत हे काही कळत नाही. मात्र त्यांच्या या लंडन दौर्याने त्यांची राजकीय गोची झाली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय झाला तर त्याचे श्रेय भाजपाला मिळेल या भीतीने शिवसेनेच्या मंत्र्यांना ग्रासले आहे. म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना अशी विनंती केली त्यांनी कर्जमाफीची घोषणा करण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. शिवसेना मंत्र्यांच्या या विनंतीमागे श्रेयाचे राजकारण आहे. मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कर्जमाफीची घोषणा केली तर, उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसारच कर्जमाफी झालेली आहे असे ढोल बडवायची संधी शिवसेनेला मिळू शकते. तशी ती मिळावी म्हणूनच कर्जमाफीच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी अशा शिवसेनेच्या मंत्र्यांचा आग्रह आहे. त्या आग्रहामागे त्यांनी जे कारण दिलेले आहे तेही मोठे मनोरंजक आहे. कर्जमाफी ही शिवसेनेच्या आदेशानेच झाली पाहिजे. कारण शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा ही मागणी सर्वात आधी उध्दव ठाकरे यांनी केलेली आहे. अर्थात हा शिवसेनेच्या मंत्र्यांचा दावा आहे. वस्तुस्थिती तशी नाही. परंतु आपण शेतकर्यांचे मोठे कैवारी आहोत हे दाखवून देण्याची ही संधी सोडायला शिवसेना तयार नाही.
शिवसेनेचे नेेते शेतकर्यांचे खरेच किती कैवारी आहेत हे तर मागे अनेकदा दिसून आले आहे. गेल्या ३-४ महिन्यातल्या शिवसेनेच्या वल्गना आणि पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेख वाचले तर शिवसेनेला शेतकर्यांची कर्जमाफी किती निकडीची वाटते हे दिसून येईल. या सगळ्यातून शिवसेना आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळा तर शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून शिवसेना सरकारमधून बाहेरसुध्दा पडू शकेल असे शिवसेनेने म्हटले होते. परंतु त्यांचा हा सारा आविर्भाव नकली होता कारण या मुद्यावरून शिवसेना कधीच सरकारच्या बाहेर पडलेली नाही. तेव्हा शेतकर्यांचा कैवार हे शिवसेनेचे सोंग आहे आणि आता प्रत्यक्षात मुख्यमंंत्र्यांच्या पुढाकाराने कर्जमुक्ती होण्याची वेळ जवळ आली तेव्हा शिवसेना ती आपल्यामुळेच होत आहे असा दावा करायला पुढे सरसावली आहे. शिवसेनेने खरोखरच सरकारमधून बाहेर पडण्याची कृती केली असती तर शिवसेनेला कर्जमाफीचे खरे श्रेय मिळू शकले असते. परंतु शिवसेनेने जी एक दुतोंडी भूमिका घेतलेली आहे तिच्यामुळे शिवसेनेला खरोखर काय पाहिजे आहे हे कळत नाही. शिवसेनेला सगळा समाज आपल्या मागे आणायचा आहे आणि हे सारे सत्तेत राहून करायचे आहे. हे खरेच असते तर शेतकर्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत उध्दव ठाकरे महाराष्ट्रातच ठाण मांडून बसले असते. लंडनवारीवर गेले नसते.