देशातील ८१ लाख तरुणांनी सोडले व्यसन !


नवी दिल्ली – लोकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागरुकता निर्माण होत असून देशातील ८१ लाख तरुणांनी २०१६-१७ मध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेतल्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवन करणाऱ्यात जवळपास सहा टक्क्यांनी घट झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वेनुसार (जीएटीएस) देशातील १५ ते २४ वयोगटातील तरुणांमधील तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात ६ टक्क्यांची घट झाली आहे. हे प्रमाण २००९-१० मध्ये १८.४ टक्के होते. ते २०१६-१७ मध्ये १२.४ टक्क्यांवर आले असून तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागृती निर्माण होत असून, तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून ८१ लाख तरुणांची मुक्तता झाली असून ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक विशेष पुरस्काराने नड्डा यांना नुकतेच गौरवण्यात आले. त्यांना तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘कॅच देम यंग’ हा माझा तंबाखू सेवनावरील नियंत्रणासाठी मंत्र आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीनांच्या प्रमाणात ५४ टक्के, तर १८-२४ वयोगटातील तरुणांच्या प्रमाणात २८ टक्के घट झाली आहे. हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया नड्डा यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment