सातपुडा पर्वतरांगांची राणी, पंचमढी


मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमधील जंगले हे वाघांचे जगातील सर्वात मोठे निवासस्थान मानले जाते. या भागात समुद्रसपाटीपासून १०६० मीटर उंचीवर वसलेले छोटेसे हिल स्टेशन पंचमढी सातपुडा पर्वतरांगांची राणी म्हणून ओळखले जाते. या स्थळापासून नॅशनल पार्क, बोरी अभयारण्य अगदी जवळ आहे व त्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांत चांगलीच गर्दी असते. चोहोबाजूंनी जंगलांनी वेढलेले, शांत, सुंदर व निसर्गसौंदर्याने नटलेले पंचमढी छोटे पण विलक्षण पर्यटनस्थळ आहे.


या भागात अनेक ठिकाणे आवर्जून पाहावी अशी आहेत. महादेव गुंफेत दगडात रेखलेली चित्रकारी हे येथले मोठे आकर्षण आहे. ही चित्रे ५ ते ८ व्या शतकातील असावीत असे सांगितले जाते. यातील कांही चित्रे १० हजार वर्षांपूर्वीची असल्याचेही मानले जाते. येथील जमुना, रजत व जलावतरण धबधबे पर्यटकांचे मन मोहून टाकतात. पैकी जमुना धबधब्यात उतरता येते व मनसोक्त भिजण्याचा अनुभव घेता येतो. जटाशंकर गुंफा, महादेव व छोटा महादेव मंदिरे धार्मिक पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. येथेच पांडवांची गुंफाही असून पांडवांनी अज्ञातवासाचा काळ येथे घालविला होता असे सांगितले जाते.

धूपगढ या ठिकाणावरून उंच पहाडांच्या मागे होणारा सूर्यास्ताचा नजारा पाहायलाच हवा असा. या भागातील राष्ट्रीय उद्यानात वाघ, तरस, चिंकारे, सांबर, चितळ, अस्वले, रानगवे असे वन्य जीव दर्शन देतात.

Leave a Comment