स्पर्धा परीक्षांत मुस्लीम समाज


मुस्लीम समाजातल्या शिक्षणाविषयीचा अहवाल प्रसिध्द झाला असून त्यात उच्च शिक्षणात मुस्लिमांचे प्रमाण कमी असल्याचे म्हटले आहे. एका बाजूला ही स्थिती स्पष्ट होत असतानाच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांत ५० मुस्लीम विद्यार्थी असल्याचे दिसले आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मुस्लीम समाजाने पुढे यावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून काही स्वयंसेवी संघटनांचे प्रयत्न सुरू असून त्याला हे यश आलेले आहे. आतापर्यंतच्या आएएसच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची यंदाची ५० ही संख्या सर्वाधिक आहे. गेल्या ५ वर्षांपासून या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात असून हळूहळू मुस्लीम विद्यार्थी अधिक संख्येने यशस्वी होत आहेत.

२०१३ साली ३० मुस्लीम विद्यार्थी आएएस झाले होते. १४ साली त्यात वाढ होऊन ही संख्या ३४ झाली. २०१५ मध्ये ३८ आणि २०१६ मध्ये ३६ विद्यार्थी आयएएस झाले. ही संख्या तशी कौतुकास्पद असली तरी लोकसंख्येतले मुस्लीम समाजाचे प्रमाण विचारात घेता कमीच आहे. कारण देशाच्या लोकसंख्येत साडे तेरा टक्के मुस्लीम आहेत. पण आयएएस परीक्षा उत्तीर्ण होणार्‍यांत याचे प्रमाण तीन टक्के एवढेच आहे. मुळात उच्च शिक्षणातच मुस्लिमांची संख्या कमी असल्यामुळे एवढे कमी विद्यार्थी आयएएस होतात. या समाजातल्या झकत फाऊंडेशन ऑफ इंडिया या सारख्या संघटनांनी या दिशेने खूप प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्याची गती वाढवण्याची गरज दिसायला लागली आहे.

यंदा उत्तीर्ण झालेल्या ५० विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी पहिल्या १०० मध्ये आहेत. विशेष म्हणजे या ५० यशस्वी विद्यार्थ्यांत ६ मुली आहेत. जम्मू काश्मीरमधल्या मुस्लीम तरुणांची संख्या या यशस्वीतांमध्ये सर्वाधिक आहे. या राज्यातले १३ विद्यार्थी आयएएस झाले असून बिलाला मोहीयोद्दीन भट हा दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या एकूण १०९९ विद्यार्थ्यांमध्ये ५० ही मुस्लिमांची संख्या कमीच आहे. ती अधिक वाढण्याची आवश्यकता आहे. मुस्लिमांच्या संख्येचा विचार केला असता दरवर्षी किमान १७० ते १८० मुस्लीम तरुण आयएएस झाले पाहिजेत असे मत लखनौ गायडन्स सेंटर या संस्थेचे संचालक आगा परवेझ मसीह यांनी व्यक्त केले आहे. भारतीय प्रशासन सेवेमध्ये सध्या मुस्लिमांचे प्रमाण केवळ १.८ टक्के एवढेच आहे. अधिकाधिक मुस्लीम तरुण आयएएस होतील तसतसे हेही प्रमाण वाढत जाईल.

Leave a Comment