भारत ४ जी स्पीडमध्ये पाकिस्तान, श्रीलंकेच्याही मागे


नवी दिल्ली – सध्या इंटरनेटच्या जगात आपण आहोत. सगळीकडेच इंटरनेटचा सरार्स वापर केला जातो. तसेच हाय स्पीड आणि सुपर हाय स्पीड इंटरनेट सेवा दिल्या विविध टेलिकॉम कंपन्यांकडून जातात. पण हाय स्पीड इंटरनेट द्यायचा भारतातील टेलिकॉम कंपन्यांचा दावा पोकळ ठरतो आहे. भारत ४ जी इंटरनेटच्या स्पीडच्या शर्यतीत आता पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा मागे राहिला आहे. भारताच्या कित्येक पट मागे असलेले पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश ४ जी इंटरनेट सेवेच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे गेले आहेत.

भारतात ४ जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडची सरासरी ५.१ एमबीपीएस ऐवढी आहे. जगाच्या इंटरनेट सरासरीपेक्षा ही सरासरी एक-तृतीयांश पेक्षाही कमी आहे. जागतिक स्तरावर थ्रीजी इंटरनेटची सरासरी ४.४ एमबीपीएस ऐवढी असून भारतातील ‘४ जी’चा स्पीड यापेक्षा फक्त ०.७ एमबीपीएसने अधिक आहे. त्याचवेळी जगातील ‘४ जी’ इंटरनेट स्पीडची सरासरी तब्बल १६.२ एमबीपीएस ऐवढी आहे.

देशात ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर देऊन ‘जिओ’ने टेलिकॉम विश्वात स्पर्धा निर्माण केली आहे. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया यांनीही मैदानात उतरून इंटरनेटच्या दरांत मोठ्या प्रमाणावर घट केली आणि ग्राहकांना विविध ऑफर्स देऊ केल्या. पण, वास्तवात इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात ७४व्या स्थानावर आहे. भारतापेक्षा पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश पुढे आहेत. ४ जी इंटरनेटच्या स्पीडमध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण कोरियाचा दुसरा क्रमांक लागतो.

Leave a Comment