ऑस्ट्रीयातील अनोखे ग्रीन लेक पार्क


बागबगिचा म्हटले की डोळ्यासमोर येतात हिरवळी, तलाव, उंचउंच वृक्ष, फुलांचे ताटवे, हिरवळीतून काढलेल्या पायवाटा, विश्रांती घेण्यासाठी बाके, खडक आणि बरेच काही. ऑस्ट्रीयाच्या ट्रॅगोस भागातील ग्रीन पार्क या समजाला अपवाद नाही मात्र तरीही ते फारच अनोखे व जगातील एकमेव पार्क आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत एरवी ११ महिने नेहमीच्या बागेसारखे असलेले हे पार्क पूर्णपणे पाण्याखाली बुडते व ते अंडरवॉटर पार्क बनते. या काळात लोक येथे हिंडायला नाही तर स्कूबा डायव्हिंग करायला येतात. हे अनोखे पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरले तर त्यात नवल ते कसले?


या पार्कमध्येच एक भलेमोठे सरोवर आहे. उन्हाळा सुरू झाला की आसपासच्या बर्फाच्छादित पहाडांवरील बर्फ वितळायला सुरवात होते व हे पाणी या सरोवरात येते. परिणामी नेहमी साधारण १ मीटर पाण्याची पातळी असलेल्या या सरोवराची पातळी कांही ठिकाणी १२ मीटर पर्यंत वाढते व त्याचा आकारही २ हजारांवरून ४ हजार चौ. मीटरपर्यंत पसरतो. अशा वेळी हे पार्क संपूर्णपणे पाण्याखाली जाते. १ महिनाभर ही स्थिती राहते. अशा वेळी येथे स्कूबा डायव्हिंग करणार्‍यांची गर्दी वाढते.

यावेळी पाण्याखाली बुडालेली झाडे, हिरवळ, बाके, रस्ते या संपूर्ण दृष्याला अनोखा व अद्भूत टच देतात. स्कूबा डायव्हींग करणार्‍यांना फुलाचे ताटवे, झाडे, हिरवळी पाण्यात बुडालेल्या असल्याने एखाद्या परिराज्याची सफर करत असल्याचा आनंद मिळतो.त्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर हा नजारा अविस्मरणीय ठरतो. त्यामुळे या काळातही येथे पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात व या जगावेगळ्या पार्कचा आनंद लुटतात.

Leave a Comment