रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट जैसे थे


मुंबई – बुधवारी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले असून या पतधोरणात रेपो दरात कोणतेच बदल करण्यात न आल्यामुळे यापूर्वीचा ६.२५ टक्के एवढा रेपो दर कायम राहणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली.

एमपीसीच्या पाचव्या बैठकीत रेपो दर कायम ठेवल्याने रिव्हर्स रेपो दरही ६ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे तूर्तास तरी गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. या धोरणामुळे बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील महागाईच्या दराविषयी रिझर्व्ह बँकेकडून अंदाज व्यक्त करण्यात आला.

या अंदाजानुसार पहिल्या सहा महिन्यात महागाईचा दर २ ते ३.५ टक्के इतका राहील, तर दुसऱ्या सहामाहीत हा दर ३.५ ते ४.५ इतका राहील. याशिवाय, रिझर्व्ह बँकेकडून विकासदराच्या यापूर्वी वर्तविलेल्या अनुमानातही बदल करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच्या पतधोरणात २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.४ टक्के राहील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, आता त्यामध्ये बदल करून विकासदर ७.३ टक्के इतका राहील, असे आजच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आले.

Leave a Comment