मेघालयातील खळबळ


भारतीय जनता पार्टीचे गायीसंबंधीचे राजकारण पक्षाला महागात पडणारे आहे. गायीचे मांस खाण्यावर निर्बंध आणावेत असा भाजपाचा विचार असला तरी तो विचार सर्वांना मानवणारा नाही. विशेषतः ईशान्य भारतातील नागालँड, मिझोरम, मणिपूर इत्यादी राज्यांमध्ये तिथले आदिवासी लोक प्रामुख्याने गोमांसच खात असतात. तेव्हा भाजपाच्या नेत्यांना गाय कितीही पवित्र वाटली तरी या भागातल्या लोकांना पुरेसे पोषणद्रव्य प्राप्त होण्यासाठी गोमांसच आवश्यक वाटत असते. त्यामुळे मेघालयातील भाजपाच्या विस्ताराला मर्यादा यायला लागल्या आहेत. मेघालयाच्या उत्तर गारो जिल्ह्यातील भाजपाच्या दोघा पदाधिकार्‍यांनी पक्षाचा त्याग केला आहे. गारो हे आदिवासी लोक असून गोमांस खाणे हा त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा संकोच आपण होऊ देणार नाही, असे या नेत्यांनी पक्षाचा त्याग करताना म्हटले आहे.

असे प्रकार घडत गेले तर ईशान्य भारतात भाजपाने आपला आखलेला विस्तार कार्यक्रम आवरता घ्यावा लागेल. मात्र वरकरणी असे दिसत असले तरी वस्तुस्थिती काही वेगळीच आहे असे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ज्या दोघा नेत्यांनी भाजपाचा त्याग केलेला आहे ते गोमांसाचे कारण सांगत असले तरी मुळात त्यामागे वेगळेच कारण आहे. भाजपाच्या हायकमांडने मेघालय प्रदेश भाजपाची संघटनात्मक पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या पुनर्रचनेत आपल्याला स्थान मिळणार नाही याची जाणीव झाल्यामुळे हे दोन नेते पक्षाच्या बाहेर पडले आहेत. आता पक्षाची पुनर्रचना होईल तेव्हा याच गारो जमातीतील काही नेत्यांवर पक्षाची जबाबदारी टाकली जाणार आहे आणि गारो जमातीचे अनेक कार्यकर्ते त्यासाठी उत्सुकसुध्दा आहेत. तेव्हा गारो आदिवासींचा मुळात विरोध नाहीच.

बाहेर पडणारे हे दोन नेते ज्या गोमांसाचा उल्लेख करत आहेत तो उल्लेख चुकीचा आहे. कारण भारतीय जनता पार्टीने मेघालयात गोमांसाच्या भक्षणावर कसलीही बंधने आणण्याची चर्चासुध्दा केलेली नाही. किंबहुना गोमांसाच्या भक्षणावर देशव्यापी बंदी नाहीच. त्या त्या राज्यांनी या संबंधातले नियम करावयाचे आहेत. तेव्हा भारतीय जनता पार्टी गोमांसाच्या भक्षणावर बंदी आणत आहे असा मुळात प्रचारच चुकीचा आहे, असे भाजपाच्या ईशान्य भारतातल्या घडामोडींचे नियंत्रण करणार्‍या नेत्यांनी सांगितले. त्यांचा हा खुलासा तार्किकदृष्ट्या बरोबर असला तरी गोमांस खाणारे लोक सध्या अस्वस्थ आहेत हे नाकारता येत नाही.

Leave a Comment