युपीआयच्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क आकारणी


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळीकडेच पैशांची चणचण निर्माण झाली होती. देशातील कोट्यवधी लोक रिकामे एटीएम, बँकांमध्ये पैशांवर असलेले निर्बंध या सर्व समस्यांवर उपाय म्हणून युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा म्हणजेच युपीआयचा आधार घेत आहेत. यूपीआयच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे वळवले जाऊ शकतात. युपीआयच्या मनी ट्रान्सफरवर याआधी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नव्हते पण आता यावर शुल्क आकारणी केली जाणार आहे. कॅशलेस होण्याचे केंद्र सरकार आवाहन करत असताना कॅशलेस व्यवहारांवर शुल्क आकारणी सुरू होत असल्याने, व्यवहार कसे करायचे असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

१ जूनपासून स्टेट बँक ऑफ इंडियाने यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच एचडीएफसी बँकेकडून १० जुलैपासून यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे. कॅशलेस प्रणाली वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. कोणत्याही बँकेकडून यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर सध्या शुल्क आकारले जात नाही. यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा अधिकार बँकांकडे आहे. यापुढे व्यापारी व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारले जाणार आहे.

Leave a Comment