प्लॅस्टिकमुक्तीने ३०० महिलांना रोजगार


गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील सासानगीर या गावातील लोकांनी पर्यावरण दिनादिवशी आपले गाव प्लॅस्टिक गाव मुक्त करण्याचा निर्धार केला आणि घरोघर जाऊन तसा प्रचार करून गावातले सारे प्लॅस्टिक एकत्र केले. लोकांनी दुकानात कसलीही खरेदी केल्यानंतर प्लॅस्टिकशी पिशवी वापरू नये त्याऐवजी कपड्याची पिशवी वापरावी असा आग्रह लोकांना केला. प्लॅस्टिकमुळे गटारी कशा तुुंबतात आणि त्यामुळे गावात रोगराई कशी पसरते हे लोकांच्या लक्षात आणून दिले. ज्या लोकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या परत केल्या त्यांना केवळ पाच रुपयांमध्ये कपड्याची पिशवी दिली गेली. खरे म्हणजे प्लॅस्टिकपेक्षा कपडा परवडतो. कारण एक रुपयाची प्लॅस्टिकची पिशवी एकदाच वापरता येते पण पाच रुपयांची कापडी पिशवी १०० वेळा वापरता येते.

ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर लोकांनी या कल्पनेला प्रतिसाद दिला आणि पर्यावरण दिनादिवशी गावातून १ हजार किलो प्लॅस्टिक भंगार गोळा करून ते नष्ट करण्यात आले. याऐवजी पर्याय म्हणून दिल्या जाणार्‍या कापडी पिशव्या या जुन्या साड्यांपासून बनवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी फारसा खर्च येतच नाही. एक तर पॉलिस्टरच्या जुन्या साड्या काय कराव्यात असा लोकांनाही प्रश्‍न पडलेला असतो. पिशव्या बनवल्या हाही प्रश्‍न सुटतो आणि प्लॅस्टिकही हटवले जाते. अशा पिशव्या तयार करून या गावातल्या ३०० महिलांना रोजगार मिळालेला आहे. म्हणजे आरोग्याचा प्रश्‍न सुटला आणि जुन्या साड्यांचा सदुपयोग होऊन ३०० महिलांना रोजगार मिळाला.

विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये गावातले शासकीय कर्मचारीसुध्दा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यांनी प्लॅस्टिकही गोळा केले आणि त्याबरोबरच प्लॅस्टिकचे कप, बाटल्या याही गोळा करून कचरा गोळा करणार्‍या महिलांना दिल्या. मात्र एक दिवसाच्या या उपक्रमाने या गावाच्या आरोग्यात अमूलाग्र बदल झाला. हे गाव गीर जंगलाच्या जवळ आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना पर्यावरणाचे महत्त्व चांगलेच कळते. त्यांनी गोळा केलेला हा कचरा प्लॅस्टिकच्या पुनर्वापर करणार्‍या कारखान्यांना विकण्यात आला. त्याही विक्रीतून बर्‍यापैकी पैसा मिळाला. या स्वच्छता मोहिमेचा आणखी एक पैलू म्हणजे गावातली काही जनावरे प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन मेली होती. अशा जनावरांचे जीव आता वाचणार आहेत. कारण त्यांच्या खाण्यात प्लॅस्टिक पिशव्या येणार नाहीत.

Leave a Comment