कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या गीतेचा अभ्यास करायला सुरूवात केली आहे. आपण त्याचे स्वागतच केले पाहिजे. या निमित्ताने राहुल गांधी काहीतरी वाचायला लागतील आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल तर चांगलेच आहे. त्यातल्या त्यात ते गीता आणि उपनिषद वाचत असतील तर आणखीन चांगले आहे. परंतु या संबंधात त्यांनी जी घोषणा केली आहे तिच्यामध्ये गीता आणि उपनिषदाचा अभ्यास करत आहोत असे म्हटले आहे. त्या म्हणण्यातच ते गीतेविषयी किती अनभिज्ञ आहेत हेच लक्षात येते. मुळात गीता हेच एक उपनिषद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या एकंदर बोलण्यावरून उपनिषदाचा उल्लेख एकवचनी होत आहे, असे लक्षात येते. गीता हा एक ग्रंथ आहे तसा उपनिषद हा एक ग्रंथ नाही. अनेक उपनिषदे आहेत. तूर्तास तरी हिंदू धर्माचा अभ्यास करणार्यांनी १०८ उपनिषदांचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा राहुल गांधी त्यातल्या किती उपनिषदांचा अभ्यास करणार आहेत हे कळले तर बरे होईल.
राहुल गांधींचा गीता पाठ
गीतेचा अभ्यास करण्यापूर्वी राहुल गांधींना ही गीता मुळात का सांगितली गेली हे लक्षात घ्यावे लागेल. गीतेचा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला. तो रणांगणावर केलेला आहे. महाभारताच्या युध्दाच्या सुरूवातीला अर्जुनाच्या मनात काही प्रश्न दाटून आले आणि शेवटी आपल्या आयुष्याचे सार्थक कशात आहे अशी जिज्ञासा त्यांच्या मनात निर्माण झाली. युध्दासारखा प्रसंग समोर उभा असताना युध्द करण्याऐवजी आपले गांडीव धनुष्य टाकून देऊन अर्जुन संन्यास घ्यायला निघाला. ही गोष्ट मनात निर्माण झालेल्या संभ्रमाची द्योतक होती. म्हणूनच वर्षानुवर्षे हे सांगितले गेलेले आहे की भगवद्गीता हा ग्रंथ संभ्रमित झालेल्या व्यक्तीला मार्ग दाखवणारा आणि त्याच्या कर्तव्याची जाणीव त्याला करून देणारा आहे. एकंदरीत राहुल गांधी हे सुध्दा खूप गोंधळून गेलेले आहेत. सातत्याने निवडणुकीतील पराभवांचा सामना करावा लागल्यामुळे त्यांच्या मनामध्ये गोंधळ उडालेला आहे. नेमके काय केले म्हणजे सत्ता हस्तगत करता येईल अशा संभ्रमात ते असल्यामुळे त्यांना गीता मार्गदर्शन करू शकेल. परंतु गीतेचे एक वैशिष्ट्य असे की ज्याच्या मनामध्ये आयुष्याच्या सार्थकाविषयीचा प्रश्न दाटून आलेला असतो त्यालाच भगवद्गीतेमधून मार्ग सापडतो. केवळ गीता पाठ केल्याने ती समजत नाही. गीतेतले सर्व ७५० श्लोक मुखोद्गत असलेले जयराम रमेश राहुल गांधींना गीता शिकवत आहेत.
जयराम रमेश यांना हे श्लोक मुखपाठ आहेत पण ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे त्यांनी एखादा तरी श्लोक अनुभवला आहे का, हा प्रश्न आहे. गीतेच्या संदर्भात असे म्हटले जाते की एकवेळ ती मुखोद्गत नसली तरी चालते पण तिचा उपदेश आपल्या आयुष्यात उतरला पाहिजे आणि त्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास सात्विक भावनेतून केला पाहिजे. राहुल गांधींची अवस्था तशी नाही. त्यांनी उघडपणे असे म्हटलेले आहे की आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करायचा आहे म्हणून गीता अभ्यासायची आहे. गीता अशी नकारात्मक भावनेने अभ्यासायची नसते. आधुनिक भाषेत बोलायचे झाले तर गीता हे एक व्यक्तिमत्व विकासाचे पुस्तक आहे आणि व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणायचा असेल तर दुसर्या कोणाचा विचार करण्याऐवजी स्वतःचा विचार करावा लागतो. गीता हे ब्रह्मज्ञान आहे. रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जाणणे आपणासी आपण, तया नाव ब्रह्मज्ञान. इतर कोणाची तरी फजिती करायची म्हणून गीतेचा अभ्यास करायचा नसतो. स्वतःची आत्मिक उन्नती घडवण्यासाठी गीता अभ्यासायची असते. राहुल गांधी प्रामाणिकपणे गीतेचा अभ्यास करायला लागतील तर त्यांना या गोष्टी हळूहळू समजतीलच.
गीता हा आध्यात्मिक ग्रंथ आहे आणि अध्यात्मामध्ये आत्म्याचे अध्ययन केले जात असते. कोणाला तरी राजकीयदृष्ट्या निष्प्रभ करून सत्ता हस्तगत करणे हा अध्यात्माचा विषय नसतो. उलट अध्यात्माच्या अध्ययनाने माणूस भौतिक सुखांच्या बाबतीत आणि सत्तेच्या बाबतीत निरिच्छ होत असतो. सत्ता, संपत्ती, मान, मरातब या गोष्टी त्याला तृणवत वाटायला लागतात. तेव्हा भाजपाला हरवून सत्ता मिळवण्यासाठी जर राहुल गांधी गीतेचा अभ्यास करत असतील तर त्यांनी गीतेचा तसा अभ्यास करू नये. त्यात त्यांचेही कल्याण आणि त्यांच्या अशा अभ्यासाने भाजपाचा केसही वाकडा होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी आता गीता आणि उपनिषद अभ्यासणार असतील तर त्यांचे सेक्युलर मित्र त्यांना तसे करू देतील का? उद्या चालून राहुल गांधींना गीता आवडायला लागली आणि शाळेतल्या मुलांनासुध्दा गीता शिकवावी असे त्यांना वाटायला लागले तर त्यांच्या सोबत आघाडी करून भाजपाला पराभूत करण्यास टपलेल्या सार्या हिंदुत्व विरोधी पक्षांना राहुल गांधींची ही शिफारस मानवणार आहे का? पचणार आहे का? मात्र एक गोष्ट चांगली होईल की गीतेचा अभ्यास आता भारतापेक्षा परदेशातच जास्त व्हायला लागला आहे. तेव्हा गीतेची शिकवण समजून घेण्यासाठी परदेशी जाण्यापेक्षा भारतात राहून ती शिकावी अशी एखादी संस्था राहुल गांधी कॉंग्रेसतर्फे निर्माण करू शकतील.