रहस्यमयी सेव्हन नोज ऑफ सोहो


लंडन हे तसेही पर्यटकांचे आवडते शहर आहे. याच शहराच्या सोहो भागात पायी चालणार्‍या पर्यटकांसाठी एक मोठे रहस्यमयी आकर्षण आहे. हे आकर्षण म्हणजे भितींवर, इमारतींवर चिकटलेली सात नाके म्हणजे नोज आहेत. असा समज आहे जो या सातही नाकांचा तपास लावू शकतो त्याला आयुष्यात भरपूर धनदौलत मिळते. अनेक पर्यटक ही नाके शेाधायचा प्रयत्न करतात पण फारच थोडे त्यात यशस्वी होतात.

१९७७ सालापासून या नाकांमागे असलेले रहस्य आता रहस्य राहिलेले नाही.त्यामुळे या नाकांसंदर्भात पसरलेल्या दंतकथाही आता कथा राहिलेल्या नाहीत मात्र तरीही आज अनेक जण या दंतकथांनाच खरे मानतात. यामागची खरी कथा अशी की याच वर्षात ब्रिटन सरकारने जागोजागी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला होता मात्र आर्टिस्ट डेव्हीड बकली याला सरकारचा हा निर्णय म्हणजे खासगी प्रश्नात सरकारने नाक खुपसणे आहे असे वाटले. नागरिकांच्या खासगी आयुष्यातली सरकारची ही लुडबूड त्याला आवडली नाही म्हणून त्याने स्वतःच्या नाकाचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा ठसा बनवून त्यापासून ३५ नकली नाके तयार करून ती या भागात जागोजागी लावली. अर्थात सीसीटिव्ही असूनही ही नाके इमारतींवर, भितींवर चिकटविताना तो कधीही पकडला गेला नाही.

कालांतरने यातील कांही नाके पडून गेली मात्र अजूनही सात ठिकाणी अशी नाके आहेत. डेव्हीडने २०११ साली ही नाके त्याने कोणत्या कारणाने तयार केली व ठिकठिकाणी चिकटविली याचा रहस्यभेद केला. दरम्यानच्या काळात या नाकांबद्दल अनेक दंतकथा निर्माण झाल्या होत्या. मात्र रहस्य उलगडले असले तरीही आजही पर्यटकांना ही नाके आकर्षण असून ती शोधण्याचा प्रयत्न अनेकजण करतात.

Leave a Comment