अँटीबायोटिक्सची शक्ती हजार पटीने वाढविल्याचा वैज्ञानिकांचा दावा


वॊशिंग्टन: प्रतिजैविके अर्थात अँटीबायोटिक्सचा शोध हा मानवी आरोग्यासाठी क्रांतीकारक ठरला असला तरीही सध्याच्या काळात प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने प्रतिजैविके निष्प्रभ ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिजैविकांच्या शक्तीत एक हजार पटीने वाढ करून त्यांना जीवाणूंना नेस्तनाबूत करण्याएवढे सक्षम बनविण्याची प्रक्रिया शोधल्याचा दावा अमेरिकेतील द स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

प्रतिजैविकांना निष्प्रभ करणाऱ्या जीवाणूंचे आव्हान जगभरात आ वासून उभे आहे. फेब्रुवारी महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंची यादीच प्रसिद्ध केली आहे. मात्र सध्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्हॅन्कोमायसीन या औषधात काही सुधारणा करून त्यांची शक्ती जीवाणू नष्ट करण्याएवढी वाढविण्यात यश आल्याचे या वैज्ञानिकांच्या गटाने सांगितले. ‘प्रॉसिडिंग्स ऑफ़ नॅशनल अकॅडमी ऑफ़ सायन्स’मध्ये या संशोधनाबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सध्याच्या काळात प्रतिजैविके निष्प्रभ झाल्याने अमेरिका, युरोपमध्ये दार वर्षी ५० हजार जणांचा मृत्यू होतो. भारतात तर याबाबत अधिक भयानक परिस्थिती आहे. भारतात ९५ टक्के प्रौढ व्यक्तींमध्ये प्रतिजैविकांचा प्रभाव रोखणाऱ्या जीवाणूंची लागण झाल्याची माहिती प्रोजेक्ट रेस्सिटेंस मॅप या संस्थेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर या नवीन संशोधनाला महत्व आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment