फेसबुकचे नवे फिचर लवकरच तुमच्या भेटीला


फेसबुक युझर्सला नेहमीच काही ना काही वेगळे देत असते. आता आणखी मोठा बदल करण्याच्या मार्गावर फेसबुक असून फेसबुकने काही दिवसांपूर्वीच लाइव्ह व्हिडिओ संदर्भात दोन महत्त्वाचे फिचर्स आणणार असल्याचे सांगितले होते. फेसबुक आता पुढे एक पाऊल टाकत आणखी नवा बदल करण्याच्या मार्गावर आहे. फेसबुक आता त्यांच्या युजर्सना कव्हरमध्ये फोटो प्रमाणे व्हिडिओ देखील अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. सध्या याची चाचणी सुरू असून, ‘फेसबुक पेज’वर हा बदल अनेकांना दिसतो आहे. याचे काम पूर्ण झाल्यानंतर युजर्सना हे फिचर वापरता येणार आहे. तेव्हा फोटोच नाही तर आयुष्यातल्या खास क्षणांचे व्हिडिओ देखील युजर्स अपलोड करू शकणार आहेत.

युजर्सना या नव्या फिचर्सनुसार कव्हर पेजच्या ठिकाणी ३० ते ९० सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. पण हा व्हिडिओ कमी रिझोल्यूझनचा असणे गरजेचे आहे. युजर्सना याआधी प्रोफाईल फोटोच्या जागी व्हिडिओ अपलोड करता येत होता. फेसबुकने गेल्याच आठवड्यात ‘Live Chat With Friends’ आणि ‘Live With’ हे दोन फिचर्स आणणार असल्याचे सांगितले होते. ‘Live Chat With Friends’ या पर्यायाचा वापर करून युजर्स लाईव्ह स्ट्रिमिंग होत असताना आपल्या मित्र मैत्रिणींसोबत चॅट करु शकतात. तेव्हा फेसबुकमध्ये हे तीन मोठे बदल युजर्सना पाहायला मिळणार आहेत.

Leave a Comment