ओदिशातील खळबळ


गेल्या मार्च महिन्यात ओदिशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये सत्ताधारी बिजू जनता दलाला सर्वाधिक जागा मिळाल्या ही गोष्ट खरी पण तरीसुध्दा भारतीय जनता पार्टीने आपल्या जागामध्ये जी वाढ केली ती बिजू जनता दलाच्या नेत्यांची काळजी वाढवणारी ठरली. तत्पूर्वीच्या निवडणुकीत भाजपाला अगदी नाममात्र जागा मिळाल्या होत्या. परंतु या निवडणुकीत त्यात चौपटीने वाढ झाली. स्वतःला भरपूर जागा मिळाल्या असल्या तरी बिजदच्या नेत्यांना भाजपाचा हा भगवा झंझावात अस्वस्थ करून गेला. कारण भाजपाचे वर्चस्व वाढायला लागले तर अन्य राज्यांप्रमाणेच अनेक पक्षातले नेते भाजपात प्रवेश करतील आणि आसामात भाजपाने जसा विजय मिळवला तसाच विजय ओदिशातही त्याला मिळेल अशी भीती त्यांना वाटायला लागली.

ती भीती आता सार्थ ठरली आहे. भाजपाचे ओदिशातील नेते आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान तसेच ओदिशा प्रदेश भाजपा अध्यक्ष वसंत पांडा यांच्या नेतृत्वाखाली कालच बिजू जनता दलाच्या आणि कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. बिजदचे नेते प्रदीप बाळ सामंत यांनी भाजपात प्रवेश केला असून कॉंग्रेसच्याही काही नेत्यांनी त्यांचाच मार्ग आक्रमिला आहे. कॉंग्रेसचे नेते लाला मनोज राय हे नयागड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यालयापासून भाजपाच्या कार्यालयापर्यंत मिरवणुकीने जाऊन तिथे भगवे उपरणे परिधान केले. केओंझारचे कॉंग्रेस नेते माजी आमदार धनुर्जय सिध्दू, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव पृथ्विराज कुआनार तसेच पटाणा येथील नामवंत कॉंग्रेस नेते सत्यवान नायक यांनीही भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या पक्षात होणारी ही आवक हे शुभचिन्ह असल्याचे म्हटले आहे. इतर पक्षाचे नेते भाजपात येऊ इच्छितात. त्यामुळे राज्यातली भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. असे त्यांचे मत आहे. बिजू जनता दलाने मात्र या पक्षांतराकडे दुर्लक्ष केले आहे. एका पक्षातून दुसर्‍या पक्षात उड्या मारणे हा प्रकार नेहमीच सुरू असतो तो आता सुरू आहे त्याचे आपल्या पक्षावर कसलेही परिणाम होणार नाहीत असा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे. कॉंग्रेस पक्षानेही या पक्षांतराकडे उपेक्षेनेच पहायचे ठरवले आहे. कॉंग्रेसमध्ये राहून ज्यांचे आर्थिक हितसंबंध सांभाळले जात नाहीत. त्यांनी स्वार्थासाठी भाजपाचा आश्रय घेतला आहे असे कॉंग्रेसने म्हटले आहे.

Leave a Comment