कर्नाटकाला निवडणूक ज्वर


आगामी एका वर्षात ज्यांच्या निवडणुका होणार आहेत त्यात कर्नाटक आणि गुजरात यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जानेवारी किंवा फेब्रूवारी २०१८ मध्ये कर्नाटकातली विधासभा निवडणूक होऊ घातली असून तिथे सध्या सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे सरकार निवडणुकीच्या मूडमध्ये यायला लागले आहे. २०१३ साली तिथली भाजपाची सत्ता कॉंग्रेसने हिसकावून घेतली होती. आता पुन्हा ती कॉंग्रेसकडून खेचून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीनेही कंबर कसली आहे. तिथे मागच्या वेळी झालेल्या निवडणुकीत भाजपात फूट पडली होती. माजी मुख्यमंत्री असलेल्या बी. एस. येडीयुरप्पा यांनी पक्षातून बाहेर पडून कर्नाटक जनता पार्टी स्थापन करून त्याला निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. या फुटीचा लाभ कॉंग्रेसला झाला आणि त्यांना सत्ता मिळाली,

आता भाजपा एकसंध असल्याचे दिसत असले तरी आणि येदीयुरप्पा यांच्यावर सर्वांचा विश्‍वास असल्याचे दाखवले जात असले तरीही प्रत्यक्षात भाजपात गटबाजी आहे. सध्या विधानसभेत भाजपाचे नेतृत्व करीत असलेल्या ईश्‍वरप्पा आणि येदीयुरप्पा यांच्यातून विस्तव आडवा जात नाही. पक्षाने निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून येदीयुरप्पा यांनाच समोर करण्याचे ठरवले आहे. पण ईश्‍वरप्या यांच्या ते अजून गळी उतरलेले नाही. त्यांनी सुरूवातीला कुरबीर केली आणि आपण नाही तरी निदान आपल्या माणसांना तरी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर तिकिटे मिळावीत असा प्रयत्न सुरू केला. त्यावर येदीयुरप्पा सावध झाले आणि त्यांनी ईश्‍वरप्पासहित त्यांच्या माणसांची तिकिटे कापायला सुरूवात केली आहे|

इकडे कॉंग्रेसच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्रामय्या यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्याचे त्यांनी नक्की केले आहे. भाजपा आणि कॉंग्रेस अशा दोघांनीही जातीय समीकरणे तयार करण्यावर भर दिला आहे. कर्नाटकात दलित समाज कॉंग्रेसच्या मागे उभा रहातो असे वारंवार दिसून आले आहे. म्हणून सिद्रामय्याच भावी मुख्यमंत्री असतील असे जाहीर करून दलित मतदारांना आपलेसे करण्याचा कॉंग्रेसचा विचार सुरू आहे. दुसर्‍या बाजूला भाजपानेही लिंगायत आणि वक्कलीग या दोन मोठ्या जाती गटाला खुष करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातली ही निवडणूक पूर्णपणे जाती जातीतील निवडणूकठरणार आहे. राज्यात लिंगायत २३ टक्के आणि वक्कलीग समाज २१ टक्के आहे.

Leave a Comment