एनडीटीव्ही विकत घेणार बाबा रामदेव ?


मुंबई – एनडीटीव्ही ही भारतातील अत्यंत प्रतिष्ठेची वृत्तवाहिनी मानली जाते. पण ती गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत आहे. एनडीटीव्ही दूरदर्शनवरील वाहिन्या वगळता डिजिटल आणि ई कॉमर्समध्ये देखील आहे. डिजिटल वगळता दोन्ही अन्य उद्योग हे पूर्णपणे तोट्यात असल्यामुळे एनडीटीव्ही काही गुंतवणूकदारांशी चॅनेलच्या विक्रीसंदर्भात बोलणी करत असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एक्सचेंज फॉर मीडिया डॉट कॉमने दिले आहे. या गुंतवणूकदारांमध्ये बाबा रामदेव यांचाही समावेश असून त्यांनी चॅनेलच्या भागधारकांशी प्राथमिक बोलणी केल्याचे वृत्त आहे.

मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया एनडीटीव्हीचे सीईओ केवीएल नारायण राव यांनी दिलेली नाही. एनडीटीव्हीचे तीन तिमाहीतील उत्पन्न गेल्या वर्षीच्या ३९६.०३ कोटींवरून घसरून यंदा ३६८.३२ कोटी रुपये झाल्यामुळे कंपनीची अवस्था आधीपेक्षा बिकट झाल्याचे स्पष्ट आहे. परिणामी नवीन मालकांचा शोध घेण्यात येत असल्याचे व त्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

पतंजलीच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची चांगलीच क्षमता रामदेव बाबांनी सिद्ध केल्यामुळे वृत्त प्रसारणाच्या धंद्यातही ते उतरतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तसेच ते या व्यवसायातही यशस्वी होऊन दाखवतील का अशी चर्चा या क्षेत्रातल्या जाणकारांमध्ये रंगल्या आहेत.

Leave a Comment