विराट कोहलीचा पेप्सीला झटका


भारतात सध्या कोला उद्योग अनेक अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने पेप्सी या लोकप्रिय कंपनीला झटका दिला आहे. या कंपनीबरोबरच्या जाहिरातीचा त्याचा करार संपुष्टात आला असून हा करार नव्याने न करण्याचा निर्णय विराटने एका खासगी चॅनलवरील मुलाखतीत व्यक्त केला आहे. आजकाल देशात स्थानिक तसेच स्वदेशी पेयेही कोला पेयांच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात बनविली जात आहेत व त्यांनाही चांगली लोकप्रियता मिळते आहे. यामुळे कोला कंपन्यांना स्थानिक कंपन्यांशी स्पर्धा करण्याची पाळी आली असून त्यांचा मुख्य भर सेलिब्रिटी जाहिरातींवर आहे.

विराट कोहली म्हणतो, ज्यावेळी त्याने स्वतःच्या फिटनेसवर लक्ष देण्यास सुरवात केली तेव्हा लाईफस्टाईलपेक्षाही फिटनेस किती महत्त्वाचा आहे याची जाणीव त्याला झाली. देशात सध्या वेगळे कांही तरी घडते आहे, चांगले बदल होत आहेत व त्यात सहभागी होण्यात त्याला अधिक आनंद आहे. गतकाळात ज्या वस्तू तो वापरत होता विशेषतः खाद्यपदार्थ, पेयांसारख्या वस्तू त्या तो फिटनेसचा विचार केला तर खाऊपिऊ शकत नाही. मग ज्या वस्तू मी खाऊ अथवा पिऊ शकत नाही त्या खाण्याचा अथवा पिण्याचा सल्ला केवळ पैसे मिळतात म्हणून मी बाकीच्यांना देऊ शकणार नाही. यामुळेच त्याने पेप्सीबरोबरचा करार न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. विराट पेप्सी,हर्बल लाईफ न्यूट्रीशन सप्लीमेंटस, बूस्ट या खाद्यवस्तूंसह अन्य १८ प्रकारच्या वस्तूंच्या जाहिराती करतो.

Leave a Comment