खासदारांची हजेरी


आपण आपले खासदार निवडून लोकसभेत पाठवतो. परंतु तिथे जाऊन ते नेमके काय करतात हा अनेक नागरिकांसाठी संशोधनाचा विषय आहे. कारण निवडून येऊन लोकसभेत जाऊनसुध्दा लोकसभेत एकही शब्द न बोलणारे अनेक खासदार आहेत. एक तर त्यांना बोलायला संधी मिळत नाही आणि मिळाली तरी बोलण्यासाठी कसलेच बौध्दिक भांडवल त्यांच्याकडे नसते. म्हणून महाराष्ट्रातल्या एका पत्रकाराने मौनी खासदार अशी संकल्पना रूढ करून संसदेत तोंडही न उघडणार्‍या खासदारांची यादी जाहीर केली होती. हा झाला बोलण्याचा विषय. पण मुळात राज्यसभा आणि लोकसभेत निवडून गेलेले सदस्य सदनात किती हजेरी लावतात हासुध्दा एक संशोधनाचा विषय आहे.

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशा काही दिग्गजांना त्यांचा सन्मान व्हावा म्हणून राज्यसभेवर घेतले जाते. परंतु असे लोक सदस्य असूनही सदनात कधी उपस्थित राहत नाहीत. बाकीच्या सक्रीय सदस्यांमध्येसुध्दा सदनात १०० टक्के हजेरी लावणारे सदस्य फारच कमी आहेत. दोन्ही सदनाच्या उपलब्ध कागदपत्रानुसार असे आढळले आहे की आपल्या सभागृहामध्ये १०० टक्के हजेरी लावणारे सदस्य फक्त पाचच आहेत. ५४५ लोकसभा सदस्यांपैकी ५४० खासदार लोकसभेच्या कामकाजाला कमी जास्त प्रमाणात दांड्या मारत असतात. पीआरएस लेजिस्लेटिव्ह या स्वयंसेवी संघटनेने खासदारांच्या उपस्थितीचा लेखाजोखा मांडला आहे. तो विचार करायला लावणारा आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये लोकसभा किती दिवस चालते हाच एक चिंतेचा विषय होऊन गेलेला आहे. पूर्वी म्हणजे पहिल्या आणि दुसर्‍या लोकसभेच्या कार्यकाळात वर्षातून २०० ते २२० दिवस सभागृहाचे कामकाज चालत असे. परंतु हे दिवस वरचेवर कमी होत गेले आहेत आणि आता तर वर्षातून १०० दिवससुध्दा संसद चालत नाही. मुळात संसदेचे कामकाजच कमी होते आणि त्यातही सहभागी होण्याबाबत सदस्यांत उत्साह नाही. तेव्हा आपली लोकशाही चालणार कशी असा प्रश्‍न निर्माण होतो. ती चालणार आहे सजग सदस्यांवर. असे सजग सदस्य ८० ते ९० टक्के हजेरी लावतात. मुलायमसिंग यादव, जोतिरादित्य शिंदे, राजीव सातव, मल्लिकार्जुन खर्गे, वीरप्पा मोईली, किरण खेर हे अधिकाधिक हजेरी लावणारे सदस्य ठरले आहेत. हेमा मालिनी, डिम्पल यादव या कमी हजेरी लावणार्‍या सदस्या आहेत. सोनिया गांधी यांची हजेरी ५९ टक्के तर राहुल गांधी यांची उपस्थिती ५४ टक्के आहे.

Leave a Comment