घामाची चोरी चालणार नाही


महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचा संप सुरू झाला आहे. शेतकर्‍यांनी शहरातल्या लोकांना दूध, भाजीपाला आणि फळे न देण्याचा निर्णय घेतला आहे. संपाच्या दोन दिवस आधी भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पंढरपुरात या संपावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, संपाने काही बिघडणार नाही, शेतकर्‍यांनी संप सुरू केला तर परदेशातून धान्य आयात करू असे बोलून आव्हानाची भाषा केली. माधव भंडारी यांना संपामागचे कारण नीट समजले नाही असे त्यांच्या वक्तव्यावरून वाटते. ते समजण्यासाठी एकतर शेतीच्या प्रश्‍नांची जाण असण्याची गरज आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणून सहानुभूती असायल हवी. पण त्यांनी शेतकर्‍यांचा संप हा सरकारच्या विरोधात असल्याचा समज करून घेतला आहे आणि त्यामुळे सरकार व़िरूद्ध संपकरी शेतकरी असा संघर्ष असल्याचे चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या संपाला पाठींबा देणार्‍या संघटना आणि विरोधी राजकीय पक्ष यांच्या मनात सरकारची प्रतिमा शेतकरी विरोधी तयार व्हावी हा हेतू आहे हे नाकारता येत नाही पण संपातला शेतकरी त्याच्या कोंडीच्या विरोधात संपावर गेला आहे. त्याचा हेतू राजकीय नाही.

सरकारने शेतकर्‍यांची हीच व्यथा नीट समजून घेतली पाहिजे. तरच त्याला संपातून नीट मार्ग काढता येईल. काही पत्रकार हा संप कसा असंघटित आहे आणि तो करताना आंदोलनाचे शास्त्र कसे पाळण्यात आलेले नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण वादासाठी त्यांचे म्हणणे यथार्थ असल्याचे मान्यही करू. तसे मान्य करायला काही हरकतही नाही कारण संपाला राज्यव्यापी नेतृत्व नाही. तसेच कामगारांचा संप आणि शेतकर्‍यांचा संप यात मोठा फरक असतोे. कामगारांना संप पुकारता येतो आणि संप मिटल्यावर त्यांना संपकाळातला पगारही मिळतो. शेतकर्‍यांना संप काळात होणार्‍या नेकसानीची भरपाई कोण करून देणार आहे ? आधीच टेकीस आलेला शेतकरी याही नुकसानीने जास्तच हैराण होणार आहे. हा संप फार दिवस चालणार नाही. त्याला राज्यव्यापी नेतृत्व नसल्याने संप विस्कळीतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकुणात काय तर संप लवकरच बारगळणार आहे. हे सगळे मान्य करून प्रश्‍न असा विचारला जायला हवा की, संप फार दिवस चालला नाही याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे की खेद वाटला पाहिजे ? ज्याला आनंद वाटतो त्याला शेती व्यवसायात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाचे गांभीर्य कळले नाही असे म्हणावे लागेल.

संपाची पद्धत चुकीची असली तरीही संपामागचे कारण चुकीचे नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. शेतकरी सर्व बाजूंनी नाडला गेला आहे. त्यातून कसा मार्ग काढावा याबाबत तो कमालीचा गोंधळून गेला आहे. सगळीकडे अंधार दाटून यावा अशी स्थिती आहे. नेमके काय केले म्हणजे आपली या संकटातून सुटका होईल हे त्याला समजेनासे झाले आहे. त्यामुळे त्याला जो उपाय परिणामकारक वाटतो त्या उपायाचा अंमल तो करायला लागतो. त्याचा हा उपाय त्याला संकटातून मुक्त करण्यास पुरेसा नाही ही गोष्ट मान्य आहे पण म्हणून त्याने काहीच करू नये असे आपल्याला म्हणता येेत नाही. त्याने आता संपाचे पाऊल टाकले आहे कारण यापूर्वी असे काहीच पाऊल टाकण्यात आलेले नव्हते. या संपाने शहरातल्या लोकांना काही दिवस शेतीमालाची चणचण जाणवेल. ती तशी जाणवलीच पाहिजे कारण त्याशिवाय या लोकांना शेतकर्‍यांच्या घामाचे मोल समजणार नाही. ेशहरातले ग्राहक शेतकर्‍यांनंी घाम गाळून पिकवलेला माल स्वस्तात विकत घ्यायला सोकावले आहेत. त्यांना शेतीमालासाठी योग्य दाम मोजण्याची सवय लागत नाही. या संपाने हे लोक जागे झाले आणि त्यांना शेतकर्‍यांचा प्रश्‍न समजला तरी संपाचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

या संपात उतरलेला शेतकरी प्रामाणिक आहे पण त्याला पाठींबा देेणारे राजकीय पक्ष मतलबी आहेत. दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी एकदा असे दाखवून दिले होते की, कोणताही राजकीय पक्ष विरोधी बाकावर बसला की त्याला शेतकर्‍यांच्या प्रेमाचे उमाळे यायला लागतात. पण तोच पक्ष सत्ताधारी झाला की त्याला आपण विरोधी बाकांवर असताना कोणासाठी आसवे गाळली होती याची आठवणही होत नाही. एखादा राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा शेतकर्‍यांनी हे जाणले पाहिजे की, हा पक्ष किंवा नेते आता विरोधी बाकावर बसावे लागले आहे म्हणून आपल्या पाठीशी उभा आहे. आता कॉंग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते स्वामीनाथन आयोगाचा अंमल करण्याची मागणी करीत आहेत पण हा आयोग तर २००६ साली सादर झाला आहे. तेव्हापासून आठ वर्षे पवार साहेब केन्द्रात कृषि मंत्री होते. त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातले सरकारही असेच दहा वर्षें हा आयोगाचा अहवाल बुडाखाली दाबून बसले होते. तेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करावासा वाटला नाही. परंतु सत्तेबाहेर फेकल्यानंतर त्यांना या अहवालाची आठवण झाली आहे. संपकरी शेतकर्‍यांनी अशा मतलबी नेत्यांपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. अन्यथा आंदोलन होईल परंतु शेतकर्‍यांची अवस्था आहे तशीच राहील.

Leave a Comment