१ जूनपासून महागणार एसबीआयची सेवा


मुंबई – भारतीय स्टेट बँक सेवा शुल्कासंबंधात १ जूनपासून नवीन नियम लागू करणार असल्यामुळे बँकेच्या काही सेवा महाग होणार आहेत. १ जूनपासून एसबीआयमध्ये नोटा बदलण्यासाठी शुल्क आकारण्यात येईल.

बँक खराब आणि फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी २ ते ५ रुपये शुल्क आकारणार आहे. एखाद्या ग्राहकाकडे २० पेक्षा जास्त नोटा अथवा त्यांचे मूल्य ५ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यासच शुल्क आकारण्यात येईल. जर एखाद्या ग्राहकाकडे २० पेक्षा कमी खराब नोटा आणि त्यांचे मूल्य ५ हजारपेक्षा कमी असल्यास त्याच्या एक्स्चेंजवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. २० पेक्षा जास्त नोटा असल्यास प्रत्येक नोटेमागे २० रुपये शुल्क आकारण्यात येईल. याचप्रमाणे सेवा कर आकारण्यात येणार आहे. नोटांचे मूल्य ५ हजारपेक्षा जास्त असल्यास २ रुपयांपासून ५ रुपयांपर्यंत शुल्क आणि त्यावर सेवा कर आकारण्यात येईल.

मूळ बचत खात्यातून पैसे काढल्यासही सेवा शुल्क आकारण्यात येईल. खातेधारकाने ४ पेक्षा अधिक वेळा खात्यातून अथवा एटीएममधून पैसे काढल्यास अधिक शुल्क द्यावे लागणार. मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम काढल्यास प्रति व्यवहारामागे २० रुपये द्यावे लागणार असून अधिक सेवा कर आकारण्यात येईल. त्याचबरोबर एसबीआयच्या एटीएमवर मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करण्यात आल्यास प्रतिव्यवहारामागे १० रुपये शुल्क आकारण्यात येतील. याचप्रमाणे सेवा कर द्यावा लागेल. दुस-या बँकेच्या एटीएमवर अधिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहारामागे २० रुपये शुल्क द्यावे लागणार असून सेवा कर अधिक आहे.

मूळ बचत खात्यावर मिळणाऱया डेबिट कार्डवर शुल्क आकारण्याचे बँकेने तयारी केली आहे. बँक आता केवळ रुपे डेबिट कार्ड मोफत देणार आहे. मास्टर आणि व्हिसा कार्डसाठी शुल्क आकारणार आहे.

Leave a Comment