आततायी पालक


बारावीचा निकाल लागला की मनात शंकांचे मोहळ जमा व्हायला लागते कारण काही मुलेे किंवा मुली नापास होतात आणि निराशेेपोटी आत्महत्या करतात. बारावीची परीक्षा पास न होणे म्हणजे काही जीवनाची लढाई हारणे नव्हे पण ही समज मुलांत नसते. त्यांना त्याचा अपमान वाटतो आणि संवेदनशील असल्यामुळे जीवन संपवतात. ही झाली मुलांची कहाणी पण काही वेळा मुुलाचे अपयश पालकांच्याच जिव्हारी लागते. आपला मुलगा अपयशी झाल्याने आपली अप्रतिष्ठाच झाली असे त्यांना वाटते आणि ते मुलांना टोचून बोलायला लागतात. येथवर ठीक आहे कारण त्यांनी आपल्या मुलांच्या यशा विषयी नको त्या कल्पना केलेल्या असतात. आपण मुलावर मोठा खर्च केला असल्याने त्यांनी चांगलेच मार्क मिळवले पाहिजेत असा त्यांचा अट्टाहास असतो.

परीक्षेतले यश म्हणजे आयुष्याचे सार्थक असा त्यांचा ग्रह असतो. त्यांच्या यशाच्या कल्पना याच्या पलीकडे जात नाहीत. ही सारी मुलाच्या अपयशामुळे निमार्र्ण होणारी केवळ प्रतिक्रिया आहे पण ती प्रतिक्रिया टोकाला जाऊन एखादा पालक मुलाच्या अपयशाने खचून जाऊन स्वत:च आत्महत्या करील असे कधी घडले नव्हते. मुंबईत असा एक प्रकार घडला आहे. एका मुलाला दहावीत ९१ टक्कें गुण होते आणि बारावीलाही त्याला असेच यश मिळावे यासाठी स्वत: एका छोट्या उद्योगाचा मालक असलेल्या या वडिलांनी सारा बंदोबस्त केला होता पण काला बारावीचा निकाल लागला आणि मुलाला केवळ (!) ७१ टक्के गुण मिळाले. त्यामुळे निराश होऊन वडिलांनीच घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांना मुलाचे ७१ टक्के गुण कमी वाटले.

खरे तर हे काही कमी गुण नाहीत पण मुलगा दहावी पास झाल्यापासून त्यांनी आपला मुलगा बारावीलाही असेच गुण मिळवून डॉक्टर होईल असे सर्वांना सांगायला सुरूवात केली होती. ती जाहीरातबाजी त्यांना भोवली. जीवनात जसे यश मिळत असते तसेच अपयशही मिळत असते. यशाने हुरळून जायचे नसते आणि अपयशाने खचून जायचे नसते हा धडा त्यांना कोणी शिकवला नव्हता. मुलाला डॉक्टर करण्याच्या वेडाने त्यांना एवढे झपाटले होते तर एवढ्याने सारे मार्ग खुंटले नव्हते. ७१ टक्के गुणांच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणाच्या इतर काही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवता आला असता. किंवा बारावीच्याच वर्गात पुन्हा बसता आले असते. अर्थात त्यांना तसा सल्ला देणारा कोणी भेटलाच नसेल तर त्यांना हे पर्याय कसे सुचणार होते ? दोन वर्षे जाहीरात बाजी ऐकणारे लोक त्यांना टोचून बोलत असतील किंवा ते आपल्याला टोचून बोलणारच असे यांनी ठरवून टाकले असणार आणि तसे कोणी बोलण्याच्या आधीच आत्महत्या केली.

Leave a Comment