‘अठरा वर्षाखालील ४ हजार बालके रोज करतात धूम्रपान’


धूम्रपानमुक्त बालकांसाठी पालकांचा निर्धार आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सर्वेक्षण अहवालात बजावले

जागतिक धूम्रपान विरोधी दिन विशेष

हैद्राबाद: दिवसभरात १८ वर्षापेक्षा कमी वयाची तब्बल ४ हजार बालके कुतूहलापोटी धूम्रपान करून बघत असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणात उघड झाली आहे. या ‘प्रयोगशील’ बालकांपैकी १ हजार बालके रोज एक किंवा अधिक सिगारेट ओढण्याच्या व्यसनाला बळी पडत असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले आहे. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी १८. १ जणांना नियमित धूम्रपानाची सवय जडल्याचे आकडेवारी सांगते.

आरोग्याला घातक असलेल्या धूम्रपानाला परिणामकारकतेने आळा घालायचा असेल; तर किशोर वयीन मुलांना धूम्रपानापासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे मत विख्यात बालरोगतज्ज्ञ आणि ‘केअरमोटो डॉट कॉम’च्या सहसंस्थापक डॉ. निवेदिता रावुरी यांनी व्यक्त केले. धूम्रपानाचे व्यसन असलेल्यांपैकी ८८ टक्के जणांनी आपण वयाच्या १८ वर्षाच्या आसपास धूम्रपानाला सुरुवात केल्याचे मान्य केले आहे. यावरून याच वयोगटात धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता स्पष्ट होते; असे त्या म्हणाल्या.

बालकांना धूम्रपानाच्या व्यसनापासून आणि दुष्परिणामांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी मुख्यतः पालकांची आहे. ती ओळखून पालकांनी आपल्या सवयी आणि जीवनपद्धती अंगीकारावी; असे आवाहन करून डॉ. रावुरी म्हणाल्या; स्वतः धूम्रपान करणाऱ्या बहुतेक पालकांना आपल्या मुलांनी धुम्रपानापासून दूर राहावे; असेच वाटते. मात्र त्यासाठी आपण धूम्रपान सोडण्याची, कमी करण्याची, किमान मुलांसमोर तरी धूम्रपानापासून दूर राहण्याची तयारी ठेवण्याची आवश्यकता आहे.

धूम्रपान करणाऱ्या बहुतेक सर्व पालकांना त्याच्या दुष्परिणामांची आणि ‘पॅसिव्ह स्मोकिंग’च्या दुष्परिणामांचीही माहिती असते. धूम्रपान करणाऱ्या माता- पित्यांच्या अर्भकाच्या तात्काळ मृत्यूची अथवा गर्भाच्या मृत्यूची (सडन इन्फन्ट डेथ सिंड्रोम) शक्यता अधिक असते. धूम्रपान करणाऱ्या मातापित्यांनी आपल्या ४ महिन्यापर्यंतच्या बालकाबरोबर तरी अंथरुणावर झोपणे टाळले पाहिजे.; असा इशारा डॉ. निवेदिता यांनी दिला.

बालकांना पालकांकडून मिळणाऱ्या अप्रत्यक्ष धूम्रपानाचा शारीरिक दुष्परिणामांपेक्षा अधिक धोकादायक आणि दीर्घकालीन दुष्परिणाम डॉ. निवेदिता यांनी निदर्शनास आणून दिला. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या अशुद्धी आणि विकारांपेक्षाही त्यामुळे त्यांच्यामध्ये धूम्रपानाबद्दल अप्रत्यक्षपणे निर्माण होणारे आकर्षण त्यांना धूम्रपानाच्या विळख्यात अडकविण्यास प्रभावी ठरते; असे त्यांनी दाखवून दिले. हे आकर्षण जाणीवपूर्वक नव्हे; तर अजाणतेपणाने त्यांच्या मेंदूत कार्यान्वीत होते आणि अर्थातच त्यांच्या व्यसनाधीनतेला ते स्वतः नव्हे; तर त्यांचे पालक जबाबदार ठरतात; असे त्यांनी सांगितले. धूम्रपान न करणाऱ्या पालकांच्या बालकांमध्ये धूम्रपानाचे व्यसन लागण्याचे प्रमाण ८ टक्के आहे; तर धूम्रपान करणाऱ्या पालकांच्या मुलांपैकी २५ ते ३० टक्के मुले वयाच्या १५ ते १७ वर्षाच्या काळात सिगारेटचा पहिला झुरका अनुभवतात; असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment