परिवारातील मतभेद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रसिध्द करण्यात आलेल्या अनेक लेखांमध्ये नरेंद्र मोदी यांची तुलना काही लोकांनी इंदिरा गांधी यांच्याशी केली. इंदिरा गांधी या एकाधिकारशाहीवादी होत्या आणि कॉंग्रेस पक्षाबरोबरच केंद्र सरकारमध्येही त्यांचा एकट्याचाच आवाज चालत असे. तसा मोदींचा एकट्याचाच आवाज सध्याच्या सरकारमध्ये चालतो असा आरोप या लोकांनी केला. परंतु ती वस्तुस्थिती नाही. नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंकुश आहे. त्याशिवाय संघाशी संबंधित असलेल्या भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघ अशाही संघटना मोदी सरकारवर आपला अंकुश चालतो हे दाखवण्याच्या निमित्ताने सरकारच्या विरोधात अधूनमधून बोलत असतात. तेव्हा मोदींचे नेतृत्व इंदिराजींएवढे निरंकुश नाही.

भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच कानपूरमध्ये पार पडले. या अधिवेशनात मजदूर संघाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात ठराव मंजूर केला आहे. मोदींच्या पुढाकाराने आणि मर्जीने नेमण्यात आलेल्या नीती आयोगाची पुनर्रचना करावी अशी मागणी या ठरावात करण्यात आली आहे. सध्याचा नीती आयोग अपूर्ण तर आहेच पण तो देशातल्या कारखानदार आणि भांडवलदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करत आहे असेही भा.म. संघाच्या या ठरावात म्हटले आहे. नीती आयोगावर शेतकरी, कामगार आणि महिला यांचे प्रतिनिधीत्व नसल्यामुळे नीती आयोगाच्या धोरणाच्या निर्धारणात या वर्गांचे हितसंबंध दुर्लक्षित राहतात असे भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस पवन कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गेल्याच आठवड्यात भारतीय मजदूर संघाने आणि किसान संघाने जनुक परिवर्तित बियाणांच्या आणि जनेरिक औषधांच्या संदर्भात असाच आरोप केलेला होता. जनेरिक औषधे स्वस्तात आणि चांगली असतात आणि बाकीची औषधे महाग असतात असा मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे. परंतु सरसकटपणे असे वर्गीकरण करता येत नाही असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. परंतु किसान संघाच्या नेत्यांनी जनेरिक औषधांशी देशभक्तीची कल्पना अज्ञानाने जोडलेली आहे. असाच प्रकार जनुक परिवर्तित पिकांच्या बाबतीत घडलेला आहे. तेव्हा या संबंधात नीती आयोगावर आरोप करण्याआधी आयोगातसुध्दा देशभक्तच बसलेले आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे आणि अशा विषयांवर अर्धवट माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ञ मंडळी काय म्हणतात यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

Leave a Comment