चंदा कोचर यांना प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन


मुंबई – देशातील दुसरी मोठी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख आणि मानाच्या फोर्ब्ज यादीतील अव्वल चंदा कोचर यांचे वार्षिक वेतन गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ६४ टक्क्यांनी वाढले असून दिवसाला त्यांना २.१८ लाख पगार तर मूळ वेतनात १५ टक्के वाढ झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ७.८५ कोटी रुपये आयसीआयसीआय या खासगी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना मिळाले आहेत. ही रक्कम आधीच्या वर्षांत ४.७९ कोटी रुपये होती. कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत २.६७ कोटी रुपये मूळ वेतन मिळाले आहे. तर त्यांना कामगिरी लाभांश म्हणून २.२० कोटी रुपये मिळाले आहेत. कोचर यांचे गेल्या वर्षांत एकूण उत्पन्न उत्कृष्ट कामगिरी म्हणून दिल्या जाणाऱ्या लाभांशामुळे कमालीचे वाढले आहे.

खासगी बँकेला आधीचे वित्त वर्ष २०१५-१६ मध्ये फारसे आर्थिक यश न मिळाल्याने त्या वर्षांत कोचर यांना कामगिरी लाभांश मिळाला नव्हता. बँकेने २०१५-१६ च्या शेवटच्या तिमाहीत नफ्यातील ८७ टक्के घसरण नोंदविली होती. गेल्या आर्थिक वर्षांत कोचर यांचे मूळ वेतन १५ टक्क्यांनी वाढले आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२ टक्के वाढ झाली आहे. हा लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ८२,८४१ आहे. गेल्या आर्थिक वर्षांत बँकेच्या कार्यकारी संचालकपदावरील व्यक्तींना ७.५६ कोटी रुपयांचे वेतन मिळाले आहे. कोचर यांच्यानंतर सर्वात मोठे पद भूषविणारे कार्यकारी संचालक एन. एस. कन्नन यांच्या वेतनात २०१६-१७ मध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे.

Leave a Comment