देशातील सर्व मेडिकल ३० मे रोजी राहणार बंद


नवी दिल्ली – देशातील सर्व मेडिकल येत्या ३० मे रोजी बंद असणार आहेत. सरकारकडून औषधांच्या विक्रीवर लावण्यात आलेले कडक नियम शिथिल करावे, या मागणीसाठी एक दिवसाचा राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला आहे. हा एक दिवसाचा संप ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टकडून पुकारण्यात आला आहे. पण असोसिएशनच्या या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना जास्त बसणार आहे. २९ मे रोजी रात्री १२ वाजता संपाला सुरूवात होणार आहे.

एकुण नऊ लाख मेडिकल ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टच्या अंतर्गत चालवले जातात. अनेक वेळा आमच्या तक्रारी सरकारकडे मांडल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आता संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टचे म्हणणे आहे. मेडिकलच्या या राष्ट्रव्यापी संपाची पूर्वसूचना पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय तसेच औषध नियंत्रक कक्षात देण्यात आली आहे. सरकार आपल्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मेडिकल असोसिएशनने सरकारवर केला आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर ३० मे रोजी सरकारच्या विरोधात निदर्शनसुद्धा केली जाणार आहेत.

Leave a Comment