पाकिस्तान ः मृत्यूचा सापळा


पाकिस्तानात फसगत झालेल्या उजमा अहमद या भारतीय तरुणीने तिथून यशस्वीरित्या सुटका झाल्यानंतर भारतात येऊन पाकिस्तान विषयीचे आपले जे मत व्यक्त केले आहे ते पाकिस्तानी जनतेला आणि काश्मीरमधील पाकिस्तान धार्जिण्या फुटिरांना विचार करायला लावणारे आहे. उजमा अहमद ही भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नामुळे पाकिस्तानातून सुटली आणि वाघा बॉर्डरवर तिने भारतात पाऊल टाकले तेव्हा विलक्षण भावूकतेने तिने जमिनीला स्पर्श करून भारतीय मातीचा टिळा आपल्या कपाळी लावला. सुषमा स्वराज यांची तिने गळाभेट घेतली आणि आपल्या अश्रूंना वाट करून दिली. पाकिस्तान एक मृत्यूचा सापळा आहे, असे तिने पाकिस्तानचे वर्णन केले.

उजमा अहमद ही मलेशियामध्ये एका कामाच्या निमित्ताने गेली असता तिचे पाकिस्तानातल्या एका तरुणाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून तिने आपल्या मित्राच्या साह्याने पाकिस्तानचा दौरा करायचे ठरवले. पाकिस्तान देश आहे तरी कसा हे बघण्याची तिला उत्सुकता होती. पण तिच्या या मित्राने तिला दहशतवादी कारवायांनी त्रस्त असलेल्या बुणेर भागात नेले आणि बंदुकीचा धाक दाखवून तिला आपल्याशी विवाह करायला भाग पाडले. तिने स्वतःच्या सुटकेसाठी काही करू नये म्हणून तिचा पासपोर्ट आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे तर उजमा ही अगदीच हतबल होऊन गेली.

नंतर तिने भारतीय वकिलातीशी संपर्क साधला आणि पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात धाव घेऊन स्वतःची सुटका करून घेतली. तिला पाकिस्तानचा हिसका कळला. बुणेर भागातले बरेच तरुण मलेशियामध्ये कामाधंद्यांच्या निमित्ताने जातात आणि तिथल्या मुलींना पळवून आणून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांना मुली उपलब्ध करून देतात. अशा अनेक मुली बुणेर भागात फसलेल्या आहेत. कारण उजमा अहमदला तिथल्या काही घरांमध्ये अनेक महिला दिसलेल्या आहेत. असे असेल तर ही मोठी चिंतेची बाब आहे. या बाबत भारत सरकारने सावध राहिले पाहिजे आणि विशेषतः फसवणूक होण्याची शक्यता असलेल्या अशा तरुणींना सावध केले पाहिजे. हे सारे प्रकरण आता संपले असले तरी एखादी तरुण अशा पध्दतीने अल्पशा ओळखीच्या आधारावर पाकिस्तानात जाऊ कशी शकते हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो.

Leave a Comment