पवित्र हेमकुंडसाहीब यात्रा सुरू


शिख समाजात अतिपवित्र मानली जाणारी हेमकुंडसाहिब यात्रा २५ मे पासून सुरू झाली असून विधिपूर्वक या गुरूद्धाराचे दरवाजे काल उघडले गेले. हिमालयाच्या कुशीत असलेल्या चमोली जिल्ह्यातील गोविंदघाटपासून ही यात्रा सुरू होते. हे गुरूद्वारा वर्षातले सात महिने बर्फाने झाकलेले असते. १५२०० फूट उंचीवर असलेला हा गुरूद्वारा जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेला गुरूद्वारा आहे. शिख भाविक मोठ्या श्रद्धेने ही यात्रा करतात. येथून ३ किमी वर असलेल्या घांगरिया या ठिकाणाहून एक मार्ग हेमकुंडसाहिबला जातो व दुसरा व्हॅली ऑफ फ्लॉवर्सकडे जातो.

हेमकुंडसाहिब येथील गुरूद्वारा नेहमीच्या गुरूद्वारापेक्षा वेगळे आहे. सात पहाडांच्या कुशीत हे पंचकोनी मंदिर उभे आहे. येथे मोठे सरेावर असून थंडीच्या दिवसांत ते बर्फाने गोठलेले असते. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांनी रचलेल्या दशम ग्रंथात या स्थळाचा उल्लेख येतो. अशी कथा सांगतात येथे रामाचा भाऊ लक्ष्मण याने एक मंदिर बांधले होते. तेथेच गुरूगोविंदसिंग यांनी दीर्घकाळ तपस्या केली व तेथे गुरूद्वारा उभारले गेले. चारी बाजूंनी वेढलेल्या उंच पर्वतरांगांचे मनोहर प्रतिबिंब येथील सरोवरात पडलेले असते. या सरोवरात हाथी पर्वत व सप्तऋषी पर्वत रांगातून पाणी येते. एक छोटा प्रवाह या सरोवराला मिळतो त्याला हिमगंगा असे नांव आहे. येथील लक्ष्मण मंदिरही पाहण्यासारखे आहे.

Leave a Comment