चिदंबरम् यांची संपत्ती


यूपीए सरकारचे अर्थमंत्री पी. चिदंबरम् आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम् यांच्या काळ्या व्यवहाराचा संशय आल्यावरून आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या निवासस्थानावर आणि देशाच्या विविध शहरांमध्ये असलेल्या कार्यालयांवर धाडी टाकल्या. या धाडी पडल्यानंतर पी. चिदंबरम् यांनी आदळआपट केलीच. आपण अगदी निर्दोष आहोत आणि मोदी सरकारच्या विरोधात वृत्तपत्रात लिखाण करतो एवढ्याच कारणाने राजकीय सूड घेण्यासाठी म्हणून हे छापे टाकलेले आहेत. प्रत्यक्षात आपण एका पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही असा आव त्यांनी आणला. प्रत्यक्षात आयकर खात्याने त्यांच्या विरोधात तयार केलेला जो अहवाल आहे तो पाहिल्यानंतर पी. चिदंबरम् यांची ही सारवासारव कशी व्यर्थ आहे हे लक्षात येतेच. पण चिदंबरम् हे किती भ्रष्ट राजकारणी आहेत यावर प्रकाश पडतो.

आयकर खात्याचा चिदंबरम् यांच्या विषयीचा अहवाल २०० पानांचा असून या अहवालामध्ये चिदंबरम् पितापुत्रांनी निरनिराळ्या १४ देशांमध्ये काळ्या पैशातून कशा मालमत्ता कमावल्या आहेत हे दाखवून देण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या अहवालाचा काही भाग पत्रकार परिषदेसमोर सादर केला. मात्र चेन्नईमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेचे वृत्त कोणत्याही वृत्तवाहिनीवर आले नाही. चिदंबरम् यांच्याशी मैत्री संबंध असणारे जे लोक माध्यमात शिरलेले आहेत त्यांनी दबावाखाली येऊन सुब्रमण्यम स्वामी यांच्या पत्रकार परिषदेचे वृत्त दाबले. अर्थात, त्यांनी ते दाबले असले तरी काही माध्यमांनी आणि सोशल मीडियाने चिदंबरम् यांच्या भ्रष्टाचाराचे सारे पुरावे उजागर केले आहेत.

आयकर खात्याच्या आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या चिदंबरम् यांच्या भ्रष्टाचाराच्या उत्खननातून कार्ती चिदंबरम् याचे २१ देशांमध्ये बँक खाती असल्याचे आढळून आले आहे. आयकर खात्याच्या या अहवालात कार्ती चिदंबरम् यांचे कोणत्या देशातल्या कोणा बँकेमध्ये खाते आहेत हे जाहीर करण्यात आले आहे. चिदंबरम् कुटुंबाने ब्रिटनमध्ये बरीच मोठी मालमत्ता खरेदी केली आहे. शिवाय विविध देशातल्या टेनिसच्या स्पर्धांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे आणि त्यातून ते बराच पैसा कमावतात असेही आयकर खात्याने दाखवून दिले आहे. पी. चिदंबरम् यांनी मंत्री झाल्यानंतर आपली मालमत्ता केवळ दीड कोटी रुपयांचे असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात केवळ भारतामध्ये त्यांच्या एकट्याची ८५ कोटींची मालमत्ता आहे.

Leave a Comment