चेफचॉवेन -मोरोक्कोतील निळी स्वप्ननगरी


मोरोक्कोतील एक प्राचीन शहर पर्यटकांच्या नकाशावर वेगाने प्रसिद्धीस आले असून या शहराला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेनदिवस वाढत चालली आहे. भारतात जसे जयपूर पिंक सिटी, जोधपूर ब्ल्यू सिटी म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे मोरोक्कोतील हे शहर ब्ल्यू सिटी म्हणून ओळखले जाते. स्थानिकांच्या भाषेत चेफचौन असा उच्चार असलेल्या या गावातील घरेच नव्हे, तर मशिदी, सरकारी इमारती, सार्वजनिक जागा, चौक, लँपपोस्ट इतकेच नव्हे तर कचरापेट्यांनाही निळा रंग आहे. निळ्या रंगाच्या अगदी फिक्कटपासून ते गडद निळ्या छटांचा वापर रंगात केला गेला आहे.


असे सांगतात की १५ व्या शतकात स्पेनमधील उठावानंतर ज्यू येथे येऊन स्थायिक झाले. त्यांनी त्यांच्याबरोबर येताना त्यांचा परंपरागत निळा रंग आणला. त्यांच्या सर्व पेंटींग्जमध्ये आकाशाचा निळा रंग आकाशाची तसेच त्यांच्या ईश्वराची आठवण म्हणून वापरला जातो. हे गांव चोहोबाजूंनी पर्वतरांगांनी वेढले गेलेले आहे. ५०० वर्षांपूर्वीचा प्राचीन किल्ला येथे आहे. आता येथील ज्यू बाहेर पडले असले तरी त्यांचा निळा रंग कायम राहिला आहे. असेही सांगतात की या गावाभोवती असलेल्या पर्वतरांगांचा आकारावरून या गावाला चेफचौन असे नांव पडले. चौन म्हणजे शिंगे. या पर्वतरांगाचा आकार बकरीच्या शिगांसारखा भासतो.

या गावातील रस्ते म्हणजे गल्ल्याच आहेत त्यामुळे येथे कार वापरात नाहीत. व्यापारी, दुकानदार त्यांचा माल रस्त्यांवरच्या उघड्या बाजारात विकतात. प्रत्येक वसंत ऋतूत येथील घरे रंगविली जातात. हे गांव खरेदीसाठीही प्रसिद्ध असून येथील हस्तउत्पादने अतिशय लोकप्रिय आहेत. त्यात लोकरीचे कपडे, गालिचे, ब्लॅकेट तसेच येथील गोट चीजही खवैय्यांची पसंती मिळवून जाते. या छोट्याशा गावात २०० हॉटेल्स पर्यटकांना सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत.

Leave a Comment