शौचालयासाठी काहीपण…


ग्रामीण भागात शौचालयांच्या अभावामुळे महिलांची अवस्था फार वाईट होते. त्यामुळे आपल्या घरात शौचालय असले पाहिजे असा आग्रह महिलांनीच धरला पाहिजे. उत्तर प्रदेशात या संबंधात एक घटना गाजली आहे. एक मुलगी विवाह होऊन आपल्या सासरी आली आणि लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी सकाळी तिलाा शौचासाठी कोठे जावे असा प्रश्‍न पडला. माहेरी शौचालय होते पण सासरी ते नव्हते. त्यामुळे तिच्या सासूने तांब्या घेऊन उघड्यावर शौचाला जाण्यास तिला सांगितले. पण ही नव विवाहित तरुणी मोठी हुशार निघाली. ती तांब्या घेऊन शौचाला गेली नाही तर ती सरळ आपल्या माहेरी निघून गेली. तिथून तिने आपल्या सासरी, शौचालय बांधल्याशिवाय सासरी येणार नाही असा निरोप पाठवला. त्याचा परिणाम म्हणजे नवर्‍याने आधी शौचालय बांधले.

या तरुणीचे राज्यात फार कौतुक झाले. तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक विवाहित मुलींनी आपल्या सासरच्या लोकांना शौचालय बांधण्यास भाग पाडले. देशाला हागणदारीमुक्त करायचे असेल तर पुरुषांपेक्षा स्त्रियाच अधिक आग्रही राहणे आवश्यक आहे. हे या उदाहरणावरून दिसून येते. बीड जिल्ह्यात एका महिलेने स्वखर्चाने शौचालय बांधताना त्यासाठी आपले मंगळसूत्र गहाण ठेवले. तिचे खूप कौतुक झाले. तिच्याचपासून प्रेरण घेऊन परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील हादगाव येथे सुलोचना पावडे या महिलेनेही मंगळसूत्र गहाण ठेवून आपल्या घरात शौचालयाची उभारणी केली. ग्रामीण भागातल्या अशिक्षित वाटणार्‍या महिलासुध्दा असा चांगला दृष्टिकोन घेऊन जगू शकतात आणि इतरांसमोर आदर्श ठेवू शकतात. हे सुलोचना पावडे यांनी दाखूवन दिले आहे. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते तिचा जाहीर सत्कार करण्यात आला.

मंत्र्यांनी या महिलेबद्दल गौरवोद्गार काढले आणि अन्य लोकांनीही अनावश्यक गोष्टीतून पैसा बचत करून प्राधान्याने शौचालयाचे बांधकाम करावे असे आवाहन केले. परंतु मंत्र्यांना या कार्यक्रमात एक प्रश्‍न का पडला नाही याची खंत वाटते. सरकार तर शौचालयासाठी अनुदान देत आहे मग असे आहे तर या महिलेला शौचालय बांधण्यासाठी अनुदान का मिळाले नाही आणि त्यांना आपले मंगळसूत्र का गहाण ठेवावे लागले असा प्रश्‍न मंत्र्यांनी विचारायला पाहिजे. अशा प्रकारच्या सत्कार समारंभामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीसुध्दा सहभागी झालेले असतात. त्यांनाही असा प्रश्‍न पडत नाही.

Leave a Comment