नवर्‍यांचा छळ


भारतातील विवाहित महिलांची अवस्था वाईट असल्यामुळे सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की सरकारचे हे कायदे स्त्रियांना अधिक अधिकार देणारे ठरले आहेत. अनेक महिला घरात छळ होत असूनही आणि कामाच्या ठिकाणी वाईट वागणूक मिळत असूनही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात. म्हणजे ज्या स्त्रियांसाठी हे कायदे केलेले आहेत त्या असहाय्य स्त्रिया या कायद्याचा वापर करतच नाहीत. अगदी मोजक्या महिला असे धाडस करतात. कारण सासरच्या मंडळींच्या विरोधात पोलिसात जाणे म्हणजे सासरच्या लोकांचे कायमचे वैर पत्करणे असते आणि अशा अवस्थेत ती महिला सासरच्या घरात स्वस्थपणे राहू शकत नाही. सासरच्या लोकांशी वैर घेऊन माहेरीही जाणे प्रशस्त नसते.

अशा कायद्यांचा गैरवापर करणार्‍याही महिला समाजात आहेत आणि कायदे महिलांना संरक्षण देणारे असल्याचा फायदा घेऊन या महिलाच सासरच्या लोकांचा छळ करत असतात. तेव्हा कायद्याने जशी पत्नीला सुरक्षा दिलेली आहे तशीच पतीलासुध्दा सुरक्षा असावी आणि कायद्याचा गैरवापर करून सासरच्या मंडळींना ब्लॅकमेल करणार्‍या महिलांना चाप लावावा अशी मागणी काही वेळा करण्यात येते. अशा कायद्याचा गैरवापर करणार्‍या महिलांमुळे कित्येक कुटुंबे कायम तणावाखाली जगत आहेत आणि आपल्या सुनेच्या जरबेखाली वावरत आहेत. अशा लोकांच्या काही कहाण्या काहीवेळा न्यायालयात समोर येतात. तेव्हा त्या पतीची आणि त्याच्या कुटुंबीयांची दया येते.

पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडे छळ होणार्‍या महिलांचे जसे अर्ज येतात तसेच पत्नीकडून छळ होणार्‍या पतींचेही १३० अर्ज या कक्षाकडे दाखल झाले आहेत. आपल्याला आपली बायको घटस्फोटाची धमकी देते, शारीरिक आणि मानसीक छळ होत असल्याची फिर्याद दाखल करून पूर्ण कुटुंबाला अडचणीत आणेन अशी धमकावणी दिली जाते. अशा प्रकारच्या तक्रारी काही पुरूषांकडून दाखल झाल्या आहेत. या महिला सहाय्य कक्षाच्या प्रमुख संगीता पाटील यांनी नवर्‍यांच्या या अर्जामध्ये तथ्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पतीपत्नीला एकदम समोर आणून त्यांचे समुपदेशन केले तर समस्येचे निवारण होऊ शकते, असेही त्यांचे मत आहे. कारण या वितुष्टातील बर्‍याच गोष्टी गैरसमाजातून आणि संशयातून निर्माण झालेल्या असतात.

Leave a Comment