जिओचे प्लान नियम डावलून ; व्होडाफोनचा आरोप


सध्या मोबाईल क्षेत्रात रिलायन्स जिओच्या इंटरनेट आणि इतर मोबाईल प्लान्सने अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्राहकांना मोफत सुविधा देण्याच्या या योजनांमुळे ग्राहक अतिशय कमी कालावधीत इतर कंपन्यांकडून जिओकडे आकर्षित झाला आहे. नुकतेच जिओने बाजारात आणलेले आपले काही टेरीफ प्लान हे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरीटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या नियमांमध्ये बसणारे नसल्याचा आरोप व्होडाफोन कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात आज केला आहे.

व्होडाफोनने दिल्ली उच्च न्यायालयात ग्राहकांना रिलायन्स जिओकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेटच्या मोफत सुविधेसंदर्भातही खटला दाखल केला होता. ही याचिका न्यायाधीश संजीव सचदेव यांच्या खंडपीठाकडे दाखल करण्यात आली होती. इतर मोबाईल कंपन्यांचे धाबे जिओच्या ऑफर्समुळे दणाणले असल्यामुळे व्होडाफोनने जिओच्या विरोधात अशाप्रकारची तक्रार दाखल केली आहे.

पण आपल्यावर कऱण्यात आलेले आरोप रिलायन्स कंपनीने फेटाळून लावले आहेत. ट्रायच्या नियमांचे आपण उल्लंघन केले नसल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. २७ जुलै रोजी व्होडाफोनने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे मोबाईल कंपन्यांची आपापसात वाढणारी स्पर्धा अखेर न्यायालयातही गेली आहे.

Leave a Comment