चंद्रास्वामींचा अस्त


भारताच्या राजकारणात तांत्रिक आणि गॉडमॅन म्हणून एक काळ गाजवलेल्या चंद्रास्वामी यांचे काल निधन झाले. मुळात राजस्थानातल्या एका सावकाराचा हा मुलगा दिल्लीत जाऊन राजकारणावर आपला एवढा ठसा उमटवेल असे कोणी म्हटले असते तर त्यावर कोेणीही विश्‍वास ठेवला नसता पण योग साधनेचे वेड लागलेल्या नेमीचंद नावाच्या तरुणाने उत्तरांचलात जाऊन हिमालयाच्या पायथ्याशी योगसाधना केली. तिच्यातून त्यांना कसलीतरी सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने नंतर चंद्रास्वामी हे नाव धारण करून अनेक मोठ्या नेत्यांना आपल्या कच्छपी लावले. खरे तर योगसाधनेने काही सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्यांना दुय्यम महत्त्व दिले जाते.

योगसाधनेचे खरे इप्सित मुक्ती हे असते. मात्र जे लोक हे विसरतात ते आपल्याला प्राप्त झालेल्या सिद्धींचे प्रदर्शन घडवतात आणि त्यातून उपजीविका भागवत राहतात. चंंद्रा स्वामी यांना कसली सिद्धी प्राप्त झाली होती हे काही कोणाला नेमकेपणाने कळले नाही पण ते आपला तिसरा डोळा उघडला असल्याचे सांगत होते. तसा तो खरेच उघडला होता की नाही हे माहीत नाही पण त्यांना राजकारणातील डावपेचांसाठी नेत्यांना मदत करण्याची आणि आवश्यक ती माणसे फोडण्याची सिद्धी नक्कीच प्राप्त झाली होती. अशा मध्यस्थांना राजकारणात पॉवर ब्रोकर असे म्हटले जाते. त्याच्या या सिद्धीचा फायदा अनेकांनी घेतला होता. त्यात काही पंतप्रधानही होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर, नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी चंद्रास्वामींचा वापर केला होता आणि त्यानेही या सर्वांकडून त्याची किंमत वसूल केली होती.

खरे तर अशा योग्याला पैशांशी काहीही देणे घेणे असता कामा नये पण चंद्रास्वामीने या सार्‍या उद्योगातून बक्कळ पैसा कमावला होता आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित अशा अनेक गुन्ह्यात त्याच्यावर कारवाईही झाली होती. त्याचा अनेक व्यापारी आणि उद्योगपतींशी जवळचा संबंध होता. जगातला सर्वात मोठा शस्त्र व्यापारी अदनात खशोगी हा तर चंद्रास्वामीचा मित्र होता. चंद्रास्वामींनी अनेक नेत्यांना फसवलेही होते. त्यात आफ्रिकेतले नेते केनेथ कौंडा यांचाही समावेश होता. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर याही चंद्रास्वामींच्या चाहत्या होत्या कारण त्यांना पंतप्रधानपद मिळण्याच्या आधीच चंद्रास्वामीने त्यांना हे पद मिळणार असल्याचे भविष्य सांगितले होते. तो राजकारणातला हाय प्रोफाईल दलाल होता.

Leave a Comment