वर्‍हाडी पोलीस


दाऊद इब्राहिमच्या मावस भावाच्या मुलीच्या लग्नाला नाशकातले काही पोलीस अधिकारी आणि काही नेते हजर राहिलेे. यावरून आता काही वृत्तवाहिन्यांनी हरकतीचे मुद्दे उपस्थित करायला सुरूवात केली आहे. एवढ्या कुख्यात गुन्हेगाराच्या नजिकच्या नातेवाईकाच्या घरच्या विवाह सोहळ्याला पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने हजर राहिले तर समाजात त्याचा काय संदेश जाईल याचा विचार पोलिसांनी करायला हवा असा या वाहिनीचा आक्षेप आहे. या संबंधात पोलिस उप महानिरीक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. दाऊद इब्राहिम हा गुन्हेगार आहे हे मान्य पण त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनाही आपण गुन्हेगार समजणार आहोत का असा सवाल त्यांनी केला. असा विचार केला तर अनेक गुन्हेगारांचे अनेक नातेवाईक असतात. ते काही गुन्ह्यात गुंतलेले नसतात. पण केवळ ते त्यांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्याकडील येणे जाणे बंद करणे काही उचित ठरणार नाही असे त्यांचे म्हणणे.

हे म्हणणे कायद्याने बरोबर आहे. पण सामाजिक भान आणि औचित्य यांचा विचार केला तर एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांनी या लग्नाला जाणे उचित नाही. या सगळ्या पोलीस अधिकार्‍यांनी या विवाहाला हजेरी लावताना थोडी खातरजमा करून घेतली असती तर ते त्याला हजेरी लावणे नक्कीच टाळू शकले असते. त्यांच्या हजेरीबद्दल समाजात दोन प्रकारची मते व्यक्त होऊ शकतात. फार पराकोटीचा तर्कशुध्द विचार केला तर दाऊदचा मावस भाऊ असणे हा काही गुन्हा नाही आणि त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यात काहीही गैर नाही. परंतु समाजातला एक वर्ग यापेक्षा वेगळा विचार करत असेल तर त्याचा विचार करून एवढ्या मोठ्या पोलीस अधिकार्‍यांनी तिकडे जाणे टाळले असते तर काही बिघडले नसते.

पोलीस अधिकारी या हजेरीचे समर्थन करत असले तरी एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी या विवाहाला उपस्थित राहिले याचे तरी नेमके कारण काय असा प्रश्‍न नक्कीच निर्माण होऊ शकतो. आज काही पोलीस अधिकारी कायद्याचे मुद्दे पुढे करत असले तरी वास्तविक त्यांच्या संबंधीचा कायदासुध्दा फार कडक आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. शासकीय कर्मचारी कोणाच्याही विवाह समारंभाला किंवा जेवणावळीला उपस्थित रहात असतील तर त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असा कायदासुध्दा आहे. तेव्हा सध्याच्या माध्यमांचा प्रभाव असणार्‍या जमान्यात पोलिसांनी अशी घाऊक हजेरी लावणे टाळायलाच हवे होते.

Leave a Comment