६६ वर्षाच्या प्रेयसीसोबत थाटला ७० वर्षाच्या आजोबांनी संसार


इटावा: माणसाने वयाची ४०शी ओलांडली की तारूण्य ओसरायला लागते आणि वयाची साठी पार केली की म्हातारपण यायला लागते, असे म्हणतात. वयाच्या साठीनंतराच काळ म्हणजे वृद्धापकाळाचा काळ म्हटला जातो. अनेक लोक या काळात घर, संसार, मोह, माया सोडून आध्यात्म, मोक्ष, देवधर्म याच्या मागे लागतात. पण, काहींचा उत्साह मात्र तरूणांनाही लाजवणारा असतो. ७०व्या वयातही म्हणूनच हे लोक तरूण आजोबा म्हणून प्रसिद्ध होतात. अशाच एका ७० वर्षांच्या तरूण आजोबांनी प्रेमाला वय नसते, याची प्रचिती दिली आहे. या आजोबांनी चक्क ६६ वर्षाच्या प्रेयसीसोबत लग्नाचा बार मोठ्या धुमधडाक्यात उडवून दिला आहे.

या आजोबांचे नाव विष्णुदयाल असे असून, मध्यप्रदेशातील औरेया जिल्ह्यातील अछल्दा कस्बे येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय महिलेसोबत त्यांनी लग्न केले आहे. इटावा जिल्ह्यातील बसरेहर परिसरातील बुलाकिपुरा गावात हे अनोखे लग्न पार पडले. या लग्नाचे वैशिष्ट्य असे की, हे ज्येष्ठ वर आणि वधू आपल्या भावी वार्धक्यातील एकमेकांचे जोडदीर बनत असताना त्यांची मुले, नातू आणि सुनाही या लग्नाला उपस्थित होते. एवढेच नव्हे तर दोन्ही परिवारातील ज्येष्ठ आणि तरूण मंडळीही मोठ्या उत्साहाने या विवाहात सहभागी झाले होते.

दरम्यान, आता जरी या आजी-आजोबांनी लग्न केले असले तरी, पाच वर्षांपूर्वीच त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. ७० वर्षीय विष्णुदयाल आणि ६६ वर्षीय रामबेटी वार्धक्यामुळे एकाकी जीवन जगत होते. दोघेही एकांतवासाला जाम कंटाळले होते. दोघांनाही पूढील जीवन जगण्यासाठी एकमेकांची साथ आवश्यक वाटत होती. त्यामुळे ५ वर्षांपूर्वीच जमलेल्या प्रेमाचे त्यांनी विवाहात रूपांतर केरून नव्या जीवनाची सुरूवात केली.

Leave a Comment