सौरठ सभा-बिहारमधील उपवर मुलांचा मेळा


लग्नात द्यावा लागणारा हुंडा, मानपान वा अन्य अनिष्ट प्रथांमुळे लोक हैराण होत असल्याचे नित्य ऐकण्यात येते. बिहारच्या मिथिलांचल भागात मधुबनी जिल्ह्यात गेली अनेक शतके सौरठ सभा या नावाने एक मेळा जेष्ठ आणि आषाढ महिन्यात भरविला जातो. हा मेळा म्हणजे उपवर मुलांचा मेळा असतो व मुलींकडचे लोक येथे येऊन मुलांना प्रश्न विचारून योग्य वराची निवड करतात व पंचांसमोर नोंदणी करून चट मंगनी पट ब्याह या पद्धतीने ही लग्ने पार पडतात. येथे प्रामुख्याने मैथिली ब्राहमण वर्गातील वधूवर येतात.

असे सांगतात की राजा हरिसंह याने ७०० वर्षांपूर्वी म्हणजे १३१० च्या सुमारास ही प्रथा सुरू केली. उपवर मुलामुलींच्या पालकांना लग्न जमविण्यासाठी करावी लागणारी धावपळ कमी करणे हा त्यामागचा हेतू होता. त्या वेळेप्रमाणे आजही वडाच्या झाडांखाली २२ बिघे जमिनीवर हा मेळा भरविला जातो. पूर्वी आसपासच्या अन्य गावातही हे मेळा भरविले जात मात्र त्याचे मुख्यालय सौराठ मेळा हेच होते.पूर्वी या मेळ्यात येणार्‍यांची संख्या लाखांवर असे मात्र आज शिकले सवरलेले तरूण या मेळ्यात येऊन बसण्यास फारसे राजी नसतात त्यामुळे येथील गर्दी कमी होत चालली आहे.

हा मेळा प्राचीन असला तरी त्यावेळेपासूनच त्याला वैज्ञानिक जोड दिली गेली आहे. म्हणजे ज्या वधूवरांच्यात लग्न लावले जाणार ते ब्लड रिलेशनमधील नाहीत याची खात्री करून घेतली जाते. त्यासाठी कुटुंबाच्या गोत्राचा आधार घेतला जातो. आजही अनेक जमातीत सगोत्र विवाह केले जात नाहीत. उपवर त्यांच्या कुटुंबियांसह झाडांखाली सतरंज्या टाकून बसतात, वधू पक्षाकडील लोक त्यांची माहिती घेऊन, कांही प्रश्न विचारून पसंती करतात व मग तेथे उपस्थित पुरोहितांकडून गोत्र तपासणी करतात व विवाहासाठी नोंदणी केली जाते. पुरोहित गोत्र जुळत असल्याचे तसेच विवाहसंबंध ठरल्याचे कागदावर लिहून देतात. पूर्वी हे भोजपत्र अथवा ताम्रपटावर लिहून दिले जात असे. यानंतर विवाह पार पडतो.

Leave a Comment