मिसा भारती अडचणीत


लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती या आता अडचणीत आल्या असून त्यांच्या कर सल्लागाराला ८ हजार कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या संबंधात सदर कर सल्लागार राजेश अग्रवाल याची केवळ चौकशी झाली असती किंवा केवळ गुन्हा दाखल झाला असता तर फार अडचण नव्हती परंतु थेट त्याला अटकच करण्यात आली असल्यामुळे मिसा भारती यांच्या समोरच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे. मिसा भारती या लालूप्रसाद यांच्या कन्या आहेत. १९७५ साली लालूप्रसाद यादव यांना आणीबाणीमध्ये मिसा म्हणजे अंतर्गत सुरक्षा कायदा या कायद्याखाली अटक करण्यात आली होती. त्याच्या जवळपास या कन्येचा जन्म झालेला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कन्येचे नाव मिसा भारती असे ठेवले.

त्या काळात लालूप्रसाद यादव इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाही विरुध्द लढत होते आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात सक्रीय होते. त्या काळातल्या त्यांच्या भूमिकेचे मिसा भारती हे नामकरण द्योतकच होते. मात्र लालूंच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा चेहरा असलेली ही कन्या आपल्या वडिलांसह मोठ्या भ्रष्टाचारात गुंतलेली आहे. म्हणून अलीकडे या कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे. अग्रवाल याची अटक ही स्वतंत्र नाही. लालूप्रसाद यादव त्यांची मुले आणि मुली यांच्या नावाने दिल्लीत झालेल्या सुमारे १०० कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेची खरेदी ही वादग्रस्त ठरलेली आहे आणि तिच्याच निमित्ताने लालूप्रसाद यादव आणि तिचे कुटुंब अडचणीत आलेले आहेत.

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हे मिसा भारती यांच्या कर सल्लागाराचे प्रकरण उघड झाले. त्यामुळे कर सल्लागाराची अटक त्याच्यापुरती राहणार नसून लालूप्रसाद यादव आणि मिसा भारती यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. राजेश अग्रवाल हा दिल्लीत व्यवसाय करत असून त्याचे अनेक प्रतिष्ठीत लोकांशी संबंध आहेत आणि या प्रभावशाली व्यक्तींना मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी तो कार्यरत असतो आणि त्यातून तो काळ्या पैशाला संरक्षण देतो असा त्याच्यावर आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडे त्याच्या या काळ्या बाजाराचे पुरावे असल्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेतून आता लालूप्रसाद आणि मिसा भारती यांच्याही भ्रष्टाचारपर्यंत पोहोचणे तपास यंत्रणांना सोपे जाणार आहे.

Leave a Comment