मालेगावातील कसरत


मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. या महानगरपालिकेत आतापर्यंत भाजपाने कधीही उमेदवार उभे केलेले नव्हते. कारण भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि मालेगाव हे मुस्लीम बहुल शहर आहे. मालेगावात कोणत्याही पक्षाचे बहुमत येऊ द्या परंतु त्या पक्षाचे नेतृत्व नेहमीच मुस्लीम समाजाकडे असेल. कारण शेवटी तिथले मुस्लीम समाजाचे बहुमत निर्णायक आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने तिथे निवडणूक लढवणे हे एक साहस आहे. या पूर्वी असे साहस भाजपाने केलेले आहे. २०१२ साली भाजपाने ८४ सदस्यांच्या महापालिकेत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केलेले होते. परंतु भाजपाला तिथे एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही. आता मात्र ५६ उमेदवार उभे केले आहेत. त्यातील २७ उमेदवार हे मुस्लीम समाजाचे आहेत.

मालेगाव आणि भाजपा यांचा विचार केला असता भाजपाला या महानगरपालिकेसाठी उमेदवारसुध्दा मिळणे दुरापास्त ठरते. त्यातच २००६ आणि २००८ असे दोन वेळा मालेगावात बॉम्बस्फोट झालेले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील आणि नाजूक झालेली आहे. मुस्लीमबहुल गाव आणि भाजपाचे मुस्लीम उमेदवार यामुळे भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्ववादी अजेंड्यावरून तिथे या पक्षाला सारखी वैचारिक कसरत करावी लागते. ती करतच भाजपाच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी मालेगावात बर्‍यापैकी जमवाजमव केलेली आहे आणि जाहीर सभांमधून भाजपाचे उमेदवार प्रचार करत आहेत.

प्रचार जोरात सुरू असला तरी भाजपाच्या धोरणाचा जोरदार पुरस्कार करताना भाजपा उमेदवारांची त्रेधातिरपीट होत आहे. कारण सध्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या दोन निर्णयांमुळे मुस्लीम समाजात खळबळ माजलेली आहे. त्यातला एक प्रश्‍न आहे तिहेरी तलाकचा आणि दुसरा आहे गोहत्या बंदीचा. या दोन प्रश्‍नातून भारतीय जनता पार्टी आपला मताचा आधार व्यापक करण्याचा प्रयत्न करत आहे. हे दोन निर्णय मुस्लीम समाजाच्या पचनी पडणारे नाहीत. परंतु ते घेतल्यास हिंदू समाजाची मते भाजपाच्या मागे एकवटण्याची अपेक्षा आहे. एका बाजूला असे दोन प्रश्‍न उभे असतानाच भारतीय जनता पार्टीला मुस्लीम समाजालाही आपलेसे करण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच भाजपाचे नेते मालेगावच्या मुस्लिमांसमोर बोलताना तलाकच्या आणि गोहत्या बंदीच्या अशा दोन्ही प्रश्‍नांवर सारवासारवीची भूमिका घेताना दिसत आहेत.

Leave a Comment