सिक्कीमचे छोटे व सुंदर पर्यटनस्थळ पेलिंग


सिक्कीम राज्य तेथील स्वच्छता, लोकांचा प्रामाणिकपणा आणि निसर्गसौंदर्यासाठी देशविदेशात प्रसिद्ध आहे. पण सर्वसाधारणपणे सिक्कीमला जाणारे पर्यटक राजधानी गंगटोक व आसपासचा परिसर पाहून परततात. सिक्कीम मधील पेलिंग हे छोटेसे पण फारच सुंदर ठिकाण आता पर्यटकांच्या नकाशावर आले आहे. समुद्रसपाटीपासून २१५० मीटर उंचीवर असलेले हे हिलस्टेशन चोहोबाजूनी बर्फाच्छादित शिखरांनी आणि डोंगररांगांवरून दिसणार्‍या सुंदर दृष्यांनी पर्यटकांना अक्षरशः खिळवून ठेवते. कांचनजुंगा पर्वतरांगाचे सर्वात सुंदर दर्शन येथून होते.

या छोट्याशा गावाला इतिहास आणि संस्कृतीचे वरदानही आहे. गंगटोकनंतर ते आता सिक्कीम मधील दोन नंबरचे लोकप्रिय पर्यटनस्थळ ठरले आहे. येथील दोन महाप्रचंड बौद्ध मठ, छांगे वॉटरफॉल, सिंगसोरे ब्रिज मुद्दाम जाऊन पाहण्यासारखे. येथे दोन तीन दिवसांचा मुक्काम टाकून आसपासचा परिसर फिरता येतो. त्यात जगातील दोन नंबर उंचीचा सस्पेन्शन ब्रिज, कांचनजुंगाचा डोळे दिपविणारा प्रचंड मोठा धबधबा आवर्जून भेट द्यायलाच हवी अशी ठिकाणे आहेत.


येथे प्रामुख्याने लिम्पु समुदायाची अधिक वस्ती आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून वेलची, तांदूळ, मका, गहू, सातूचे उत्पादन घेतले जाते. ऑगस्टमध्ये येथे कांचनजुंगा महोत्सव होतो.त्यात व्हाईट वॉटर राफ्टिंग, पहाडी बाईकींग, अन्य साहसी व पारंपारिक खेळांचा समावेश असतो. त्यावेळी हे छोटेसे स्थळ उत्सवाच्या रंगात अक्षरशः न्हाऊन निघालेले असते.

Leave a Comment